सौंदत्ती श्री यल्लमा देवी यात्रा आटोपून येळ्ळूरला परतणाऱ्या भाविकांचा पडल्या भरणे कार्यक्रम सुरळीत व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने यल्लाप्पा पाटील व त्यांचे मित्र प्रशांत नंदीहळ्ळी यांनी गावच्या थडे देवस्थान जवळील जमिनीचे स्वखर्चाने सपाटीकरण व स्वच्छता केली आहे.
सालाबाद प्रमाणे येळ्ळूर गावचे सर्व भाविक सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवस्थानला गेले आहेत. श्री यल्लमा देवस्थानावरून परतल्यानंतर गावातील थडे देवस्थान परिसरात पडल्या भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने केला जातो.
त्यासाठी येळ्ळूर गावचे माजी ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा पाटील व त्यांचे सहकारी मित्र प्रशांत नंदिहळ्ळी यांनी स्वखर्चाने थडे देवस्थान जवळील जमीन ट्रॅक्टर व जेसीबीच्या साह्याने स्वच्छ करून सपाटीकरण केले. येथे होणाऱ्या पडल्या भरण्याच्या कार्यक्रमासाठी शेकडो भाविक जमा होत असतात.
या भाविकांना त्रास होऊ नये या उद्देशाने जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पदावर नसतानाही गावाच्या हितासाठी यल्लाप्पा पाटील स्वखर्चाने विकास कामे करत असल्यामुळे येळळूरवासियांमध्ये त्यांची प्रशंसा होत असून समाधान व्यक्त केले जात आहे.