बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वारे वाहू लागले आहेत बेळगाव मधील चार मतदार संघामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय पक्षांनी साम-दाम-दंड-भेद या तत्त्वावर आधीपासूनच काम करणे सुरु केले आहे.
याचबरोबर ग्रामीण मतदार संघासह संपूर्ण तालुक्यातील वातावरण समितीमय करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने उत्तम फिल्डिंग लावली आहे. याचा प्रत्यय तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजिलेल्या महिला मेळाव्यादरम्यान आला आहे. हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात पुन्हा एकदा तालुक्यातील महिलांनी समितीला विजयी करण्याचा निर्धार केला आहे.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने दोन महिला मेळाव्यांचे आयोजन केले. या मेळाव्यांना महिलांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे पाहून राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. विविध भेटवस्तूंचे आमिष दाखवून मेळावे, हळदी-कुंकू आणि अनेक वैयक्तिक कार्यक्रम करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समिती नेत्यांनी चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. भेटवस्तूंच्या अमिषाला नव्हे तर स्वाभिमान आणि समिती निष्ठेला जागून उपस्थिती दर्शविलेल्या महिलांनी समितीच्या पंखांमध्ये पुन्हा बळ निर्माण केले आहे.
दोन्ही महिला मेळाव्यात हजारोंच्या संख्येने झालेल्या महिलांच्या गर्दीचा विषय हा राष्ट्रीय पक्षांना इशारा देणारा ठरला आहे. स्वाभिमान गहाण टाकून मतदान करणार नाही तर यंदाच्या निवडणुकीत समितीच्या पाठीशी एकमुखाने पाठिंबा दर्शवून समितीला विजयी करण्याचा निर्धारच जणू महिला वर्गाने केल्याचे मेळाव्यातून दिसून आले. गेल्या १५ दिवसात झालेल्या दोन महिला मेळाव्यात महिला वर्गाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांचाही भुवया उंचावल्या आहेत.
रिंग रोड विरोधातील लढा असो किंवा बायपास किंवा शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकारी धोरणाविरोधात उभारण्यात आलेला लढा असो.. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने व्यापक मोहीम आखत हजारो शेतकऱ्यांना एकसंघ करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. तालुक्यात असलेल्या सर्वाधिक मराठी भाषिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यात तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यशस्वी ठरली आहे. याचाच प्रत्यय महिला मेळाव्यातून दिसून आला आहे. मागील काही दिवसात मराठी माणूस समितीपासून दुरावल्याचे चित्र दिसत होते.
मात्र महिलांनी समितीसाठी दाखविलेला एकनिष्ठपणा आणि महिला मेळाव्याच्या माध्यमातून समितीला पाठिंबा देण्यासाठी केलेला निर्धार हा विधानसभा निवडणुकीतील सर्वांसाठी महत्वपूर्ण टप्पा ठरणार हे नक्की !