ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) नजीक मोरेना येथे भारतीय वायु दलाच्या दोन लढाऊ विमानांच्या अपघातात वीरमरण पत्करलेले संभाजीनगर, गणेशपुर हिंडलगा येथील सुपुत्र विंग कमांडर हणमंतराव रेवणसिद्धय्या सारथी यांचे पार्थिव आज रविवारी दुपारी वायुदलाच्या विशेष विमानाने बेळगावला आणण्यात आले. विमानतळावर शहरवासीयांसह हवाई दल, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शहीद विंग कमांडर हणमंतराव सारथी यांचे पार्थिव असलेल्या भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाच्या लँडिंगसाठी बेळगावच्या सांबरा विमानतळावर खास व्यवस्था करण्यात आली होती. सदर विमानाचे आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास विमानतळावर आगमन होताच विंग कमांडर हणमंतराव सारथी यांचे शेवपेटीतील पार्थिव मोठ्या सन्मानाने विमानाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर विमानतळाच्या ठिकाणी विंग कमांडर हणमंतराव सारथी यांना शोकमय वातावरणात श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शहरवासीयांतर्फे बेळगावचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी शहीद विंग कमांडर हणमंतराव सारथी यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी नितेश पाटील, बेळगावचे पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख नितेश पाटील, बेळगाव जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन आदी मान्यवरांसह सांबरा येथील भारतीय हवाई दल केंद्राच्या प्रमुखांसह हवाई दलाचे प्रमुख तसेच अन्य वरिष्ठ हवाई दल अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून विंग कमांडर सारथी यांना श्रद्धांजली वाहिली.
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या अपघातात बेळगावच्या विंग कमांडर हणमंतराव सारथी यांना वीरमरण आले हे कळताच अतिशय दुःख झाले. विंग कमांडर हणमंतराव यांच्या सारख्या योद्ध्याच्या निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरात मी ही सामील आहे. ईश्वर विंग कमांडर सारथी यांच्या आत्म्यास शांती व सद्गती देवो असे जिल्हाधिकारी नितेश पाटील श्रद्धांजली वाहिल्यानंतर बोलताना म्हणाले. श्रद्धांजलीपर कार्यक्रमानंतर फुलांनी सजविलेल्या संरक्षण दलाच्या खास ट्रकमधून शहीद विंग कमांडर हनुमंतराव सारथी यांचे पार्थिव संभाजीनगर, गणेशपुर हिंडलगा येथील त्यांच्या निवासस्थानी रवाना करण्यात आले.