राज रोड, चव्हाट गल्ली येथील फुटलेल्या जलवाहिनीमुळे पाण्याचा अपव्यय होण्याबरोबरच गढूळ दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
राज रोड, चव्हाट गल्ली (कीर्ती हॉटेल मागे) येथे 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी घालताना त्या ठिकाणी असलेली पाण्याची जुनी जलवाहिनी फुटून गळती लागली आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून जलवाहिनी दुरुस्तीसाठी स्थानिकांनी वारंवार तक्रार करून देखील अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
दरम्यान गळती लागलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीकडे करण्यात येत असलेल्या दुर्लक्षामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच फुटलेल्या जलवाहिनीमुळे पाणी तर कमी दाबाने येतच आहे, शिवाय पिण्याच्या पाण्याबरोबर जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी साचलेले गढूळ पाणी आसपासच्या घरांमध्ये नळावाटे येऊ लागले आहे.
या गढूळ दूषित पाण्यामुळे नागरिकांचे विशेष करून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी लोकप्रतिनिधीसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन राज रोड, चव्हाट गल्ली येथील जलवाहिनीची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.