बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्याच्या १८ विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या मतदार यादीत जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघातील एकूण ३८ लाख ३३ हजार ३७ मतदारांची नावे नोंद आहेत. सध्या अंतिम मतदार यादी जरी जाहीर करण्यात आली असली तरी नव्या मतदारांची नोंदणी मात्र सुरूच राहणार आहे.
एकूण मतदारांपैकी १९ लाख ३६ हजार ८८७ पुरुष मतदार आणि १८ लाख ९६ हजार १० महिला मतदार आहेत तर १४० इतर मतदार आहेत. या मतदार यादीत ५४ हजार ८२० तरुण मतदारांची नोंद झाली आहे.
नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी ऍप सुरु करण्यात आले असून या ऍपच्या माध्यमातून नव्या मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाव आणि बदललेला पत्ता नोंद करण्यासाठी सदर ऍप कायमस्वरूपी सुरु राहणार आहे.
बेळगावमधील एकूण १८ विधानसभा मतदार संघांसाठी ४ हजार ४३४ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. यामध्ये शहरासाठी ३,२५५ तर ग्रामीण भागासाठी ११७९ केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. यापूर्वी एकूण ३७८८२६६ मतदार होते मात्र आता मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. बेळगावसह आज संपूर्ण राज्यातील मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील मतदार यादीत ५४ हजार ८२० तरुण मतदारांची नावे नोंद झाली असून याबाबत यापूर्वीच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन मतदार नोंदणीबाबत आवाहन करण्यात आले होते. यानुसार निवडणुक केंद्रावर मतदार यादीसाठी अनेकांनी नाव नोंदणी केली आहे.