बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी आयोजिण्यात येणाऱ्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे सांगता गोवा येथील संतसाहित्याचे अभ्यासक कृष्णाजी कुलकर्णी यांच्या व्याख्यानाने झाली. ‘संत शिकवण व आजचा समाज’ या विषयावर कृष्णाजी कुलकर्णी यांनी विवेचन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत होते. प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांनी स्वागत केले.
यावेळी बोलताना कृष्णाजी कुलकर्णी म्हणाले, मराठीचे काय होणार, असे सगळीकडे चिंतन असले तरी अनेक वर्षापासून आपली मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या संतांनी अपार परिश्रम घेतले आहेत. संपूर्ण देशभर शांती स्थापित करण्यासाठी संतांच्या विचारांची गरज आहे.
आजच्या समाज व्यवस्थेत संतांची परंपरा पुढे नेण्याची गरज आहे. संतांच्या शिकवणीमध्ये अठरा पगड जातीचे लोकसहभागी होते. संतांनी जातिभेद निर्मूलनाची शिकवण दिली, त्यांच्या शिकवणीत भावनेचा ओलावा होता, असे त्यांनी सांगितले.
संतांच्या साहित्य निर्मितीची ख्याती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर जगभर आहे. मात्र संतांकडून मिळालेला वारसा, श्रमप्रतिष्ठेचा अभाव यामुळे आधुनिक युगातील व्यक्तिमत्त्वे भकास होत आहेत, अशी खंत व्यक्त करत भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यात संतसाहित्याचे योगदान मोठे असून संतांची शिकवण, संतांची मूल्ये सोबत घेऊनच आज समाजव्यवस्था पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.