बेळगाव लाईव्ह : रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेली १० आणि २० रुपयांची नाणी घेण्यास अनेकजण नकार देत असल्याचे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. सदर नाणी चलनात नसल्याच्या अफवा पसरविण्यात आल्याने अनेकजण नाणी स्वीकारण्यास नकार देत आहेत.
२००९ साली १० रुपयांचे आणि २०१९ साली २० रुपयांचे नाणे चलनात येऊनही अद्याप याबाबत पुरेशी जागरूकता बेळगावमध्ये झालेली नाही. १० रुपयांच्या नाण्यांसंदर्भात रिझर्व्ह बँकेनेही खुलासा देत सदर नाणे कायदेशीर वैध असल्याचे जाहीर केले.
मध्यंतरी बेळगावमधील व्यापारी १० रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याची माहिती पुढे आली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सूचना देत हि नाणी चलनात असल्याचे जाहीर केले. १० आणि २० रुपयांची नाणी चलनात असून विक्रेते आणि ग्राहकांनीही स्वीकारणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले होते. मात्र अजूनही नागरिकांमध्ये या नाण्यांबाबत संभ्रम दिसून येत आहे
सध्या युपीआय कोड च्या माध्यमातून सर्वाधिक व्यवहार होत असून रोख रक्कमेचीही कमतरता भासू लागली आहे. शिवाय सुट्ट्या नाण्यांचा घोळ हा कायमचा असल्याने बाजारात सुटी नाणीही मिळणे अवघड झाले आहे. अशातच १० आणि २० रुपयांच्या नाण्यासंदर्भात अफवा पसरल्याने सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. यासंदर्भात बँकादेखील नाण्यांचा ओघ अधिक वाढल्याने सदर नाणी जमा करून घेण्यास नकार देत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शिवाय व्यावसायिक देखील हि नाणी स्वीकारण्यास स्पष्ट नकार देत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दुकानांमध्ये १० – २० रुपयांची नाणी स्वीकारण्यात येणार नसल्याच्या सूचना देणारे फलक देखील लावण्यात आले आहेत.
बेळगावमध्ये या नाण्यावरून अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकारही घडत आहेत. या नाण्यांऐवजी फाटलेल्या नोटा स्वीकारणे व्यापारी, भाजीविक्रेते पसंत करत आहेत. मात्र नाण्यांसंदर्भात अद्यापही बेळगावमध्ये संभ्रम दूर झालेला नाही. सध्या अनेक ठिकाणच्या एटीएम मशिनमधून देखील कमीतकमी ५०० रुपये काढण्याची सुविधा सक्तीची करण्यात आली असून युपीआय कोडच्या माध्यमातून अनेक नागरिक व्यावसायिकांकडूनच सुटे पैसे घेत असल्याचे प्रकार होत आहेत. डिजिटलायझेशनच्या युगात रोख रक्कम हातात पाहण्याचा प्रकार दुर्मिळ झाला असून मोबाईल पेमेंटचाच वापर प्रत्येकाकडून होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान किरकोळ वस्तू खरेदी करताना बँकेचे व्यवहार वाढत चालल्याचे कारण देत अनेक व्यावसायिक सुट्ट्या पैशांची मागणी करत आहे.
अशा परिस्थितीतही १०-२० रुपयांची नाणी उपलब्ध असूनही ती स्वीकारण्यास नकार देण्याच्या मानसिकतेमागील कारण समजणे कठीण झाले आहे. हा सारा प्रकार पुन्हा एकदा प्रशासनाच्या निदर्शनात आणून देणे आवश्यक आहे.