बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये सरदार्स मैदानावर सुरु असलेल्या आमदार अनिल बेनके नॅशनल लेव्हल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची दररोज मोठी गर्दी होत आहे. त्यातच रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने सामने पाहण्यासाठी सरदार्स मैदानावर प्रेक्षक गॅलरी गर्दीने खचाखच्च भरलेली होती.
रविवारी झालेल्या एकूण चार सामन्यांमध्ये मुंबई येथील झियान स्पोर्ट्स आणि फौजी ११, उत्तरप्रदेशमधील स्टार ११ आणि जम्मूकाश्मीर मधील गणराज ११, एसआरएस हिंदुस्थान जीजीबॉईज आणि एव्हीआयएम अनगोळ, गणराज ११ आणि झियान स्पोर्ट्स या संघांचे उत्कंठावर्धक सामने पार पडले. चारही सामने पाहण्यासाठी मैदानावर क्रिकेटप्रेमींनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.
रविवारी झालेल्या चार सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात झीयान स्पोर्ट्स संघाने फौजी 11 संघाचा पराभव केला, दुसऱ्या सामन्यात गणराज इलेव्हन संघाने स्टार इलेव्हन यूपी संघाचा पराभव केला, तिसऱ्या सामन्यात एसआरएस हिंदुस्थान जीजीबॉईज संघाने एव्हीआयएम अनगोळ संघाचा पराभव केला तर चौथ्या सामन्यात झियान स्पोर्ट्सने गणराज इलेव्हन या संघाचा पराभव केला.
फलंदाजी आणि गोलंदाजीच्या माध्यमातून बॅट आणि बॉल मधील संघर्षाचा अनोखा सामना बेळगावकरांना पाहण्याची पर्वणी आज लाभली. षटकार आणि चौकारांची बरसात होत असताना गर्दीने खचाखच भरलेलं मैदान टाळ्याच्या गजरात खुलून उठत होतं. मोठ्या संख्येने असलेल्या क्रिकेटप्रेमींची गर्दी पाहून एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्याप्रमाणे मैदान फुलून आल्याचे चित्र दिसून आले.
नीटनेटके नियोजन, उत्कृष्ट खेळाडू, उत्कंठावर्धक सामने, प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली गॅलरी, उत्कृष्ट फलंदाजी आणि विरोधी संघाची त्याच पद्धतीची गोलंदाजी करणारे खेळाडू, या साऱ्या वातावरणामुळे प्रेक्षकांना क्रिकेटचा वेगळाच आनंद अनुभवता आला. तसेच परराज्यातून आलेल्या खेळाडूंच्या खेळीने खेळाचा आनंद द्विगुणीत झाला. एकंदरीत आज सरदार्स मैदानावर आज दोन संघाची तुल्यबळ लढत पाहताना क्रिकेटप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता.
मुंबईचे उस्मान पटेल आणि सिकंदर शेख या दोघांनीही चौकार आणि षटकारांची आतषबाजी करून सामना एकहाती फिरवला आणि बेळगावकरांची मने जिंकली. सोमवारी कोल्हापूर येथील माजी रणजी क्रिकेट खेळाडू नंदू बामणे यासह सरदार मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खेळलेले अमर अपराध, दिलीप पाटील सोमवारी हजेरी लावणार आहेत.