राज्यातील दहावीच्या परीक्षेला येत्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रारंभ होणार असून शिक्षण खात्याने परीक्षेची तयारी सुरू केली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 33,190 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. जिल्ह्यातील 120 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून शिक्षण खात्याने या केंद्रांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनामुळे मागील तीन वर्षे दहावीच्या परीक्षेसाठी सोपी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र यावेळी नेहमीप्रमाणे दहावीची प्रश्नपत्रिका असणार आहे. येत्या मार्च -एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी रिपीटर्स विद्यार्थ्यांनी अधिक प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत. यावेळी 1213 रिपीटर्स विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
जिल्ह्यात बेळगाव शहरात दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून सर्वात कमी विद्यार्थी कित्तूर तालुक्यात आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात येणाऱ्या तालुक्यांमध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. बेळगाव शहर -8623, बेळगाव ग्रामीण -5735, बैलहोंगल -4025, खानापूर -3758, रामदुर्ग -4152, सौंदत्ती -5128, कित्तूर -1771.
परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आतापासूनच पावले उचलण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र आहे, त्या शाळांमधील मुख्याध्यापकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे तीन वर्षे दहावी परीक्षा काळात परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ठेवली नव्हती. मात्र यावेळी परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असणार आहेत, अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.