Thursday, December 26, 2024

/

गतवर्षात 68,587 विद्यार्थ्यांना बस पास

 belgaum

वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागाकडून 2022 -23 या आर्थिक वर्षात 68,587 विद्यार्थ्यांना बस पासचे वितरण करण्याबरोबरच दोन स्वातंत्र्य सैनिक व 67 अंधांना मोफत पास तर 3,195 दिव्यांगांना सवलतीच्या दरात पास वितरित करण्यात आले आहेत अशी माहिती बेळगाव विभागाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

बेळगाव परिवहन विभागातील आठ दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नींना 2 हजार रुपयांचे कुपन तसेच ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात 25 टक्के सवलत दिल्याची माहितीही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

बेळगाव विभागामध्ये बेळगाव, बैलहोंगल, रामदुर्ग, कित्तूर व खानापूर तालुके समाविष्ट असून यामध्ये या ठिकाणच्या 641 गावांपैकी 636 गावांना बस सुविधा दिली आहे. उर्वरित पाच गावांना रस्ते उपलब्ध झाल्यानंतर बस सुविधा देण्यात येणार आहे. परिवहन मंडळाच्या बसेस दररोज 2.24 लाख कि. मी. अंतर कापून सुमारे 2 लाख 90 हजार प्रवाशांना सेवा देतात.

दरम्यान, बेळगाव शहर व मध्यवर्तीय बस स्थानकाच्या नूतन इमारतीचे काम सुरू झाल्यानंतर परिवहन महामंडळाच्या बसेसच्या मार्गात बदल करावा लागला याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. याखेरीज वेतन वाढीसाठी गेल्या एप्रिल 2021 मध्ये कर्मचारी वर्ग 16 दिवस संपावर गेल्यामुळे बेळगाव विभागाला 1140.60 लाख रुपयांचा फटका बसला.

त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात लॉकडाऊन जारी केल्याने 5855.32 लाखाचे उत्पन्न घटले तर त्यानंतरच्या काळात अतिवृष्टीमुळे 71.93 लाख रुपयांचा फटका बसला होता.

गेल्या 2021-22 या आर्थिक वर्षात बेळगाव विभागाला 7067.85 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. आता 2023 -24 या नव्या वर्षात बससेवा सुरळीत झाल्यास उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.