बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी योजना राबवूनही आजदेखील बेळगावमधील विविध मार्गावर पथदीपांची सोय नाही. बेळगावमधील कित्येक रस्ते आजही अंधाराच्या साम्राज्यातच उभे आहेत. तर दुसरीकडे मात्र दिवसाढवळ्याही वीजखांबावरील लाईट सुरूच आहेत, असे चित्र आहे.
वारंवार होणाऱ्या या प्रकाराबाबत अनेकवेळा मनपाला जाग आणून देण्यात आली आहे. मात्र अद्यापही मनपा आणि विद्युत विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी निद्रावस्थेत आहेत.
बेळगावमधील कपिलेश्वर रोड वरील उड्डाणपुलावर दिवस उजेडातही पथदीप सुरूच असल्याचे निदर्शनात आले आहे. दिवस उजाडूनही खांबावरील लाईट सूर्य ठेवून सूर्य प्रकाशाला कृत्रिम प्रकाशाची जोड देण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात येत आहे कि काय? असा प्रश्न या उड्डाणपुलावरून मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांकडून आज उपस्थित केला जात होता.
वीज वाचविण्यासाठी सरकारला जाहिराती द्याव्या लागतात, जनतेला आवाहन करावे लागते. मात्र दुसरीकडे स्वतः सरकारी यंत्रणाच याबाबत बेजबाबदार असेल तर मग याचा जाब कुणाला विचारणार? असाही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.
एकीकडे विजेचा वापर करताना सर्वसामान्य जनता धास्तावली असताना दुसरीकडे दिवसाच्या उजेडातही पथदीप सुरु ठेवून स्थानिक वीजविभाग विजेच्या मुबलक साठ्याचे प्रदर्शन करत असल्याचे चित्र दिसत आहे.