बेळगाव लाईव्ह : मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या दहावी परीक्षेचे वेळापत्रक शिक्षण खात्याने महिना आधीच जाहीर केले आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिक्षण खात्याने परीक्षेच्या व्यवस्थापनाची तयारीहि सुरू केली असून शिक्षण खात्याकडून परीक्षा केंद्रांचा आढावा घेण्यात आला आहे.
यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दहावी परीक्षेला सुरुवात होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ३३१९० विद्यार्थी यावर्षी परीक्षा देणार असून एकूण १२० परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. परीक्षेला अजून बराच कालावधी असला तरीही शिक्षण खात्याने आत्तापासूनच परीक्षा केंद्रांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे
कोविडमुळे गेल्या तीन वर्षात विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आली होती मात्र यंदा पूर्वीप्रमाणेच दहावी प्रश्नपत्रिकेची रूपरेषा असेल. गेल्या तीन वर्षात दहावीच्या परीक्षेसाठी सोपी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रश्नपत्रिकेमध्ये अवघड प्रश्नांची संख्या देखील कमी करण्यात आली होती. मात्र यंदा विद्यार्थ्यांना कोणतीही सवलत नसल्याने अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बेळगाव शहरात सर्वाधिक आहे तर सर्वात कमी विद्यार्थ्यांची संख्या कित्तूर तालुक्यातील विद्यार्थ्यांची आहे. यावेळी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करून घ्यावी लागणार आहे. गेल्या तीन वर्षात परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आली होती. मात्र यावेळी परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे
यंदाच्या दहावी परीक्षेसाठी अर्ज करण्यास दोन वेळा मुदत वाढही देण्यात आली होती. याचा लाभ पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला असून यंदाच्या परीक्षेत अधिक प्रमाणात पुनर्परीक्षा देणारा विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आतापासूनच शिक्षण विभागाने तयारी सुरू करण्याची सूचना केली आहे. पुढील महिन्यात ज्या शाळेमध्ये परीक्षा केंद्र आहे त्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.
यंदा बेळगाव शहरातील ८६२३, बेळगाव ग्रामीण भागातील ५७३५, बैलहोंगल विभागातील ४०२५, खानापूर विभागातील ३७५८, रामदुर्ग विभागातील ४१५२, सौंदत्ती येथील ५१२८, कित्तूर येथील १७७१ असे एकूण ३३१९० विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.