बेळगाव लाईव्ह : हुबळी सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या एसआर चॅलेंजमध्ये बेळगावच्या डॉ. सतीश बागेवाडी यांनी उत्तम कामगिरी करत ५ एसआर पदके पटकाविली आहेत. ऑडॅक्स कॅलेंडर वर्षात 200 किमी, 300 किमी, 400 किमी तसेच 600 किमी सायकलिंग पूर्ण करून त्यांनी एसआर पदके प्राप्त केली आहेत.
डॉ. बागेवाडी हे बेळगावमधील एक ईएनटी विशेषज्ञ आहेत. तसेच बेळगाव वेणुग्राम सायकलिंग क्लबचे सदस्य आहेत.
२०१९ पासून त्यांनी सायकल चालवायला सुरुवात केली. सायकलिंगप्रति असलेले त्यांचे समर्पण आणि मेहनतीचे फळ त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाले असून त्यांच्या मेहनतीमुळेच त्यांना उल्लेखनीय टप्पा गाठता आला.
५७ वर्षीय डॉ. सतीश बागेवाडी यांनी ५ दिवसात १५०० किमी. सायकल चालवून ५ एसआर पदके पटकाविली आहेत. त्यांनी केलेल्या अविश्वसनीय कामगिरीमुळे त्यांना प्रतिष्ठित सुपर रँडोनियर ही पदवी मिळाली आहे.
डॉ. बागेवाडी यांनी २०२१ साली हुबळी ते म्हैसूर पर्यंत १००० किमी.ची एलआरएम राइड देखील पूर्ण केली आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी देखील हे आव्हान पूर्ण करण्यासाठी शरीराची ताकद जितकी महत्त्वाची आहे तितकीच मनाची शक्तीही महत्त्वाची आहे, असे त्यांचे मत आहे.