अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन कॅम्प येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल व सेंटपॉल हायस्कूल गेटसमोर गतिरोधक बसवण्याची विनंती वजा मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते व संबंधित कंत्राटदारांना केली आहे.
कॅम्प येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल व सेंटपॉल हायस्कूल नजीक रस्त्यावर विशेष करून ग्लोब टॉकीजकडून हिंडलग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. शाळांमुळे या रस्त्यावर विद्यार्थ्यांची कायम ये -जा सुरू असते.
विशेष करून सकाळी शाळा भरण्याच्या वेळी आणि शाळा सुटल्यानंतर सदर रस्ता विद्यार्थी विद्यार्थिनींनी फुलून जातो. अशावेळी अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याखेरीस या रस्त्यावर शाळा सुटल्यानंतर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीचे प्रकारही अधेमधे घडत असतात.
शालेय मुलांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन या रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक सकाळी व संध्याकाळी ठराविक वेळेत बंद ठेवण्यात यावी अशी मागणी यापूर्वी वारंवार करण्यात आली आहे. मात्र त्याची शाश्वत अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
पालकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर या ठिकाणी रहदारी पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अलीकडे हा पोलीस क्वचितच या ठिकाणी आढळून येतो. या सर्व बाबी ध्यानात घेऊन विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सदर रस्त्यावर सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल व सेंटपॉल हायस्कूल गेटसमोर गतिरोधक बसवण्याची विनंती सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार कुलकर्णी यांना केली आहे.
या उभयतांनी आपली विनंती मान्य केली असून येत्या 4 दिवसात सेंटपॉल व सेंट जोसेफ हायस्कूल येथे गतिरोधक बसविण्यात येतील असे आश्वासन दिले असल्याची माहिती सुनील जाधव यांनी बेळगाव लाईव्हला दिली.