लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची यात्रा ६ जानेवारी रोजी होत आहे. कोविड नंतर संपूर्ण निर्बंध उठल्याने यावर्षी तब्बल दहा लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर यात्रा काळात उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यात्रा काळात होणारी प्रचंड गर्दी पाहून मंदिर प्रशासनाच्यावतीने भक्तांच्या सोयीसाठी जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती, मंदिराचे प्रभारी कार्यकारी अधिकारी बसवराज जिगराळ यांनी दिली आहे.
कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवीच्या दर्शनाला वर्षभर भाविकांची गर्दी असते. यामध्ये प्रामुख्याने जानेवारी महिन्यात होणाऱ्या यात्रेला भाविकांची सर्वाधिक गर्दी असते. यावर्षी होत असलेल्या शाकंभरी पौर्णिमा यात्रेला निर्बंध नसल्याने भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे.
यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवार दिनांक ६ जानेवारी असला तरीही रविवारपासूनच विविध भागातील भाविकांचे जथ्थे तळ ठोकू लागले आहेत. हजारो भाविकांनी जोगनभावी येथे मोठी गर्दी केली असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्री निवास अगोदरच आरक्षित केले आहेत. यंदा तब्बल दहा लाख भाविकांसाठी सोय होईल यानुसार पिण्याचे पाणी,स्वच्छता,पथदीप, पोलीस बंदोबस्त, दर्शन व्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
विविध ठिकाणी पाण्याचे नळ, स्वच्छतेसाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, सर्व पथदीपांची दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था, ४० सीसीटीव्ही कॅमेरे, पार्किंगची सोय, चोख पोलीस बंदोबस्त, अतिरिक्त पोलीस कुमक अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रा उत्साहात, भक्तिपूर्ण वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिराचे प्रभारी कार्यकारी अधिकारी जिगराळ यांनी केले आहे.