बेळगाव शहरात सेवा देणाऱ्या परिवहन मंडळाच्या बस चालकांनी इंडिकेटर लावून बस थांब्याच्या ठिकाणीच बसेस थांबवाव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले हे बस चालकांना जागरूक करण्याचा उपक्रम राबवत आहेत.
शहरात बससेवा परिवहन मंडळाच्या बसचे बहुतांश चालक इंडिकेटर लावून आपली बस थांबवण्याकडे दुर्लक्ष करतात.
त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना तसेच बस थांब्यावर थांबलेल्या प्रवाशांना बस थांबणार की पुढे जाणार याचा अंदाज येत नाही.
याखेरीस काही बस चालक बस थांब्याच्या ठिकाणी बस थांबवण्याऐवजी आपल्या सोयीनुसार पुढे किंवा बसस्थानकाच्या अलीकडेच बसेस थांबवतात. सदर प्रकारामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांना धावा धाव करावी लागते.
या गोष्टींची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी इंडिकेटर दाखवून बस थांब्याच्या ठिकाणी बसेस थांबवाव्यात यासाठी बस चालकांना जागरूक करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमाची बस प्रवासी व नागरिकात प्रशंसा होत आहे.