काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आगामी विधानसभा निवडणूक अखेर कोलार मतदारसंघातून लढविणार असल्याची अधिकृत घोषणा केली असली तरी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती मतदारसंघातून देखील ते इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कोलार आणि सौंदत्ती या दोन्ही मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे समजते. मात्र सौंदत्तीमधून आपले नेते सिद्धरामय्या निवडणूक लढविणार असल्याच्या वृत्ताचा बेळगावच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी इन्कार केला असून फक्त कोलार मधूनच सिद्धरामय्या निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सिद्धरामय्या यांनी मागील विधानसभा निवडणूक उत्तर कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी मधून लढविली होती. आता पुढील विधानसभा निवडणूक कोलार मधून लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला असला तरी पक्षाचा निर्णय अंतिम असेल असेही स्पष्ट केले आहे.
दरम्यान काल बेंगलोरहून कोलारमध्ये आलेल्या सिद्धरामय्या यांचे कोलारच्या सीमेवरील पहिले गाव रामसंद्रानजीक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषी स्वागत केले.