छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी येत्या शनिवार दि. 7 ते मंगळवार दि. 10 जानेवारी 2023 या कालावधीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरच्या मैदानावर ‘शिवगर्जना’ या शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती श्री महालक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष व भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी दिली.
खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूल या शाळेमध्ये महानाट्याच्या नियोजना संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. याप्रसंगी भाजप रयत मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इरान्ना कडाडी, जिल्हा रयत मोर्चा अध्यक्ष सुधीर कुलकर्णी, भाजप खानापूर तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, राजेंद्र रायका, चांगाप्पा निलजकर, यल्लाप्पा तिरवीर व स्वप्निल यादव व्यासपीठावर उपस्थित होते.
शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मैदानावर चार दिवस होणाऱ्या शिवगर्जना महानाट्याचे 60 हजार पास मोफत देण्यात येणार आहेत. प्रत्येक दिवशी 15 हजार पास देण्यात येतील असे सांगून पहिल्या दिवशी प्रेक्षकांच्या येण्या-जाण्याची सोय करण्यात येणार आहे, अशी माहितीही विठ्ठल हलगेकर यांनी पुढे दिली.
बैठकीच्या प्रारंभी महालक्ष्मी -लैला शुगरचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले बैठकीस श्री महालक्ष्मी ग्रुपचे अन्य पदाधिकारी सदस्य तसेच खानापूर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी खानापूर तालुका रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश तिरवीर यांनी सर्वांचे आभार मानले.
खानापुरात अशाप्रकारे पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री महालक्ष्मी ग्रुप, तोपीनकट्टी आणि खानापूर भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी व शिक्षण महर्षी विठ्ठलराव हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे महानाट्य आयोजित केले आहे. ‘शिवगर्जना’ हे शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्य सध्याच्या घडीला आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य आहे.
शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या मैदानावर येत्या 7 जानेवारीपासून सलग चार दिवस दररोज सायंकाळी 7 वाजता हे शिवगर्जना महानाट्य सादर होणार आहे. तरी तालुक्यातील रसिक प्रेक्षकांसह समस्त शिवभक्तांनी छ. शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास जाणून घेण्यासाठी या महानाट्याचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.