Saturday, December 21, 2024

/

चंद्रकांत दादांना जे नाही जमलं ते पवारांनी करून दाखवलं!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि सीमाप्रश्न याबाबत महाराष्ट्रातील काही निवडक नेतेमंडळींना कमालीची आपुलकी, जिव्हाळा आणि काळजी आहे. गेल्या ६७ वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्याची तळमळ ठेवून असलेला प्रत्येक मराठी भाषिक महाराष्ट्राकडे आवासून पाहात आहे. मात्र महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळींनी मराठी भाषिकांचा भ्रमनिरास केला आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सीमासमन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील!

कर्नाटकात विविध खाजगी कार्यक्रमात सहभागी झालेल्या चंद्रकांत पाटलांनी आजवर मराठी भाषिकांचा कधीच विचार केला नाही. वर्षानुवर्षे सीमाप्रश्नासाठी तळमळीने लढा देणाऱ्या सीमावासियांच्या बाजूने चंद्रकांतदादा पाटील कधीच बोलले नाहीत. मात्र, कर्नाटकातील कार्यक्रमात आवर्जून त्यांनी कर्नाटकाच्या बाजूने बोलणे पसंत केले. अनेक राष्ट्रीय पक्षांचे नेते कर्नाटकातील निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी येतात. मात्र सीमावासियांच्या बाबत त्यांना थोडाही कळवळा असल्याचे आजवर जाणवले नाही. या उलट राजकारणातील मुझ्सद्दी आणि धोरणे नेतृत्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या शरद पवार यांनी नेहमीच सीमावासियांची बाजू उचलून धरली.

कोणतेही ठिकाण असो, जेथे सीमावासीय त्यांच्या निदर्शनात येतात त्यावेळी ते कोणताही मुलाहिजा न ठेवता सीमावासीयांच्याच बाजूने बोलतात. आज पिंपरी चिंचवड येथे आयोजिण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यातही त्यांनी कर्नाटकातील खास. डॉ. प्रभाकर कोरे यांच्याकडे पहात सीमाभागासंदर्भात मिश्किल टिप्पणी केली. पाहता पाहता दिवसभरात शरद पवार यांनी केलेली ही टिप्पणी सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाली. शरद पवार यांनी सीमावासियांसंदर्भात कटाक्षाने दाखवलेल्या आपुलकीमुळे पुन्हा एकदा सीमावासियांच्या मनातील त्यांचे स्थान वाढले आहे.

पुण्यातील खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यात ‘तेवढं बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा’! अशी मिस्केल टिप्पणी शरद पवार यांनी केली आणि या टिप्पणीने साऱ्यांचेच लक्ष वेधले. आजवर शरद पवार यांनी सीमावादासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवारांनी सीमाप्रश्नी अनेकवेळा थेट आव्हाने देत अनेकांची बोलती बंद केली आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील नेत्यांना येण्यास येथील प्रशासनाने मज्जाव केल्याने अनेक नेते बेळगावमध्ये पाऊल ठेवण्यासही कचरत आहेत. मात्र शरद पवार यांनी कोणत्याही गोष्टीला न जुमानता एकेकाळी बेळगावमध्ये प्रवेश केला हि बाब महाराष्ट्रातील नेत्यांनी अनुकरण करण्यासारखी आहे.

याउलट हातात सत्ता आणि पद असूनही चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारखे नेते बेळगावच्या दिशेने येतायेताच परत पावले वळवतात हि बाब सीमावासियांच्या मनात खटकते आहे. महाराष्ट्रात बसून थेट कर्नाटक सरकारला आव्हान देणाऱ्या शरद पवार यांच्या या हटके अंदाजामुळे आज पुन्हा एकदा सीमावासियांच्या मनात त्यांच्याविषयी आदर वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.