शांताई विद्याधार संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शहरातील न्यू गर्ल्स हायस्कूल येथे आयोजित विशेष कार्यक्रम काल मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमांतर्गत विविध शाळांना आर्थिक सहाय्य करण्यात आले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर विजय मोरे, माजी ग्रा. पं. अध्यक्ष नागराज रामराव जाधव, नंदन रायकर, युवा नेते ॲलन विजय मोरे आणि सुरज गवळी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात नागराज जाधव यांनी गेल्या सात वर्षात सुमारे 45 लाख रुपये किमतीची जुनी पेपर रद्दी आणि पुस्तकांच्या विक्रीतून जमा झालेल्या निधीद्वारे 485 विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केल्याबद्दल शांताई विद्याधार संस्थेच्या संचालकांचे अभिनंदन केले. यावेळी विजय मोरे, विनायक लोकूर, संतोष ममदापुर आणि इतर सदस्यांच्या मार्गदर्शनानुसार न्यू गर्ल्स स्कूल आणि विज्ञान विकास मंदिर स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सदर शाळांना प्रत्येकी 10 हजार रुपये तर भरतेश हायस्कूलला 20 हजार रुपयांची शैक्षणिक मदत करण्यात आली. सदर रकमेचे धनादेश शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी बोलताना नागरिकांनी आपल्याकडील शक्य होईल तितकी पेपर रद्दी आणि वापरलेली पुस्तके विद्याधर संस्थेकडे सुपूर्द करावी, ज्यामुळे सर्व गरजू विद्यार्थ्यांना लाभ होईल असे आवाहन माजी महापौर विजय मोरे यांनी केले.
त्याचप्रमाणे न्यू गर्ल्स हायस्कूल शाळेला 6 लाख रुपयांची देणगी देणारे आणि निवृत्तीनंतर देखील शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या गावडे सरांची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. सदर कार्यक्रमास विद्याधर संस्थेचे सदस्य, हितचिंतक, शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.