उपेक्षित ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेला वाहून घेतलेल्या शांताई वृद्धाश्रम संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत 2023 -24 साला करिता वृद्धाश्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय पाटील यांची आणि कार्याध्यक्ष म्हणून माजी महापौर विजय मोरे यांची पुन्हा फेरनिवड करण्यात आली. तसेच युवा पिढीला वाव देण्यासाठी विनायक विजय पाटील, भगवान वाळवेकर व ॲलन विजय मोरे यांची संस्थेच्या संचालकपदी एकमताने निवड करण्यात आली
शांताई वृद्धाश्रमाच्या कार्यकारणीची वार्षिक सभा काल रविवारी शांताईच्या प्रार्थना हॉलमध्ये पार पडली. बैठकीत वरील प्रमाणे निवड करण्याबरोबरच वृद्धाश्रमाची सल्लागार आणि विकास समिती स्थापना करण्याचे ठरवण्यात आले. या समितीत संजय वालावलकर, गंगाधर पाटील, पुंडलिक पाटील, संजय अनबर, संजय नागनाथ, शंकर नवघेकर, प्रसाद प्रभू, सुरज गवळी व नागनाथ जाधव यांची निवड करण्यात आली. नुतन संचालकांचे शांताई वृद्धाश्रमाच्या संस्थापक सौ शांताई भरमा पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
सदर बैठकीमध्ये 24 वर्षाची वाटचाल करून 25 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या शांताई वृद्धाश्रमाच्या दडणघडणीमध्ये ज्या सेवेकरी मंडळींनी मनापासून योगदान दिले त्या सेवेकरी मंडळींचा शांताई पाटील यांच्याकडून भरघोस भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक विजय मोरे यांनी करून आश्रमाच्या कार्याची माहिती दिली.
शांताईचे अध्यक्ष विजय पाटील यांनी आश्रमाचे सदस्य आजोबा -आजी आणि सेवेकरी मंडळींना मार्गदर्शन केले. यावेळी भगवान वाळवेकर यांनी आश्रमाचा कार्य वाढवण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कटिबंध आहोत असे सांगितले. बैठकीत यापुढे प्रत्येक महिन्याला वेगवेगळे कार्यक्रम करून आश्रमाचा 25 वा वर्धापन दिवस साजरा करण्याचे ठरवले.
पहिला कार्यक्रम बामणवाडी गावामध्ये लुप्त होत चाललेला भारुड भजन कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित झाले. तसेच येत्या 29 तारखेला संध्याकाळी 4 वाजता ड्रग कंट्रोलचे अधिकारी रघुराम सर यांच्या टीमच्यावतीने शांताई वृद्धाश्रमामध्ये जुन्या गाण्यांची माहितीचा कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले. आगामी फेब्रुवारी महिन्यामध्ये पंढरपूरची दिंडी दुपटेश्वर मंदिरापासून शांताई वृद्धाश्रमापर्यंत काढण्याचे ठरले. याप्रसंगी संतोष ममदापूर, विजय पाटील, विजया विजय पाटील, मारिया विजय मोरे, शरद विजय मोरे, मोहम्मद कुंडीभावी आदींसह शांताई वृद्धाश्रमाचे सर्व संचालक, वृद्ध मंडळी व हितचिंतक उपस्थित होते. शेवटी नवनिर्वाचित संचालक विनायक पाटील व ॲलन मोरे यांनी आपण जबाबदारीने उत्तम कार्य करून आश्रमात नावलौकिक भर घालणार असल्याचे स्पष्ट करून सर्वांचं आभार मानले.