बेळगाव लाईव्ह : बेळगावचे ‘लॉर्ड्स’ मैदान अशी ओळख असणाऱ्या ‘सरदार्स’ मैदानावर आमदार अनिल बेनके ऑल इंडिया लेव्हल टेनिसबॉल क्रिकेट टुर्नामेंटच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरदार्स मैदानाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सरदारांसाठी ब्रिटिश काळात उभारण्यात आलेले सरदार्स हायस्कुल आणि या हायस्कुलपरिसरात असलेले ‘सरदार्स’ मैदान हे बेळगावकरांसाठी ऐतिहासिक देणगीच म्हणावी लागेल.
ब्रिटिशकाळात सरदार्स हायस्कुलमध्ये शिकलेल्या अनेक दिग्गजांनी यशाचे उच्च शिखर गाठले आहे. मोचनगड या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक रा. वि. गुंजीकर, ख्रिस्ती साहित्याचे जनक बाबा पदमनजी यासारखे अनेक दिग्गज साहित्यिक हे सरदार्स हायस्कुलमध्येच शिकले. ब्रिटिश काळात स्थापन झालेलं सरदार्स हायस्कुल आणि या हायस्कुलच्या प्रांगणात असलेलं विशाल मैदान. या मैदानावर महाराष्ट्र-कर्नाटकातील अनेक दिग्गज टेनिसबॉल क्रिकेटपटुंनी क्रिकेट सामने रंगवले आहेत.
बेळगावसह पुणे, मुंबई, गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर यासह अनेक ठिकाणच्या खेळाडूंनी येथील क्रिकेट सामने रंगवले आहेत. या मैदानावर भरविण्यात येणारे क्रिकेट सामने पाहण्यासाठी पूर्वीही चारीबाजूंनी गर्दी व्हायची आणि आजही हि गर्दी तशीच खिळून आहे.
रस्त्यावरून जाणारे नागरिकदेखील आपसूक मान उंचावून, काही काळ थांबून सामना पाहूनच पुढे जातात, हि सरदार्स वर रंगणाऱ्या क्रिकेट सामान्यांची खासियत आहे. क्रिकेटसाठी प्रसिद्ध असलेल्या या मैदानावर आजवर मँगो ट्रॉफी, रेणुका ट्रॉफी, महापौर चषक, आमदार चषक यासारखे अनेक महत्वपूर्ण सामने रंगले आहेत. शिवाय या चषकामध्ये देशपातळीवरील अनेक स्पर्धकांनीही सामने रंगविले आहेत. पुणे, मुंबई, गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर अशा विविध भागातील खेळाडूंनी येथील चषक गाजली आहेत. क्रिकेट सामान्यांचे समालोचन करण्याची पहिली पद्धत देखील बेळगावमधील सरदार्स मैदानावरूनच सुरु झाली.
आमदार अनिल बेनके यांच्यामुळे क्रिकेटची हि रंगत पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी बेळगावकरांना मिळाली आहे. आमदार अनिल बेनके पुरस्कृत ऑल इंडिया लेव्हल टेनिसबॉल क्रिकेट टूर्नामेंट च्या माध्यमातून होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी देशपातळीवरील अनेक संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघाला ५००००१ रुपये, आणि उपविजेत्या संघाला २५०००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
तर मॅन ऑफ द सिरीज साठी रॉयल एन्फिल्ड दुचाकी बक्षिसादाखल देण्यात येणार आहे. कोल्हापूर, सावंतवाडी, गोवा, रायगड, पुणे, मुंबई, रायगड, जम्मू काश्मीर, केरळ, गुजरात, तामिळनाडू येथील संघ क्रिकेट सामन्यात उतरणार आहेत. यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी मिळाली आहे. आज पहिल्याच दिवशी क्रिकेट शौकिनांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून या स्पर्धेनिमित्त जुने खेळाडू, सरदार्स वर सामने रंगविलेले आजी-माजी खेळाडू यांच्यासाठी क्रिकेट सामन्यामुळे गतस्मृतींना उजाळा मिळणार आणि १८ जानेवारीपर्यंत क्रिकेटचा उत्सव रंगणार हे नक्की!