बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके पुरस्कृत 5 लाख रुपये बक्षीस रकमेच्या अखिल भारतीय पातळीवरील भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. स्पर्धेसाठी सरदार्स मैदानावर दर्जेदार खेळपट्टी बनवण्याबरोबरच मैदानाची साफसफाई व सपाटी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
आमदार ॲड. अनिल बेनके पुरस्कृत राष्ट्रीय पातळीवरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा येत्या 6 जानेवारीपासून शहरातील सरदार हायस्कूल मैदानावर सुरू होत आहे. सदर स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसह देशभरातील विविध ठिकाणचे मातब्बर क्रिकेट संघ भाग घेणार आहेत.
भव्य बक्षीस रकमेच्या या स्पर्धेची तयारी सुरू करण्यात आली असून सध्या सरदार हायस्कूल मैदानाची साफसफाई करून सपाटीकरण केले जात आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खास उत्तम दर्जाची खेळपट्टी बनविण्यात येत असून त्यासाठी खुदाई केली जात आहे. या सर्व कामांची आज आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले, बेळगाव शहरात गेल्या तीन -चार वर्षात भव्य बक्षीस रकमेची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा झाली नसल्यामुळे तशी स्पर्धा व्हावी अशी समस्त क्रिकेटप्रेमींची इच्छा होती.
ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ही स्पर्धा मी पुरस्कृत केली असून स्पर्धा आयोजनासाठी अन्य कांही मैदानांचा प्रस्ताव आम्ही मांडला होता. मात्र स्थानिक क्रिकेट प्रेमीं व खेळाडूंसह परगावच्या क्रिकेटपटूंनी तुम्ही क्रिकेट स्पर्धा भरवणार असाल तर ती सरदार्स मैदानावरच घ्या अशी मागणी केली. याचा अर्थ कर्नाटकसह गोवा व महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंना सरदार मैदान माहित आहे. प्रत्येकाची या मैदानावर खेळण्याची इच्छा असते. चार वर्षांपूर्वी जे या मैदानावर खेळले त्या परगावच्या खेळाडूंनी आम्हाला स्पर्धेचे आयोजन सरदार्स मैदानावरच करावे अशी विनंती केली आहे. सर्वांच्या आवडीचे हे मैदान आहे.
फक्त कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात वगैरे ठिकाणच्या संघातील खेळाडूंची सरदार मैदानाला पसंती आहे असे सांगून एकंदर देशातील सर्व टेनिस बॉल क्रिकेटपटूंचे सरदार्स मैदानावर प्रेम आहे हे स्पष्ट होते असे आमदार बेनके यांनी सांगितले. तसेच यंदाची ही स्पर्धा म्हणजे बेळगावकरांसाठी टेनिस बॉल क्रिकेटची मेजवानी असणार आहे. देशातील दिग्गज खेळाडू जे प्रदेशात जाऊन खेळतात त्यांना पाहण्याची संधी शहरवासीयांना मिळणार आहे.
मुख्य स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी प्रदर्शनीय क्रिकेट सामने खेळविले जातील असे स्पष्ट करून या क्रिकेट स्पर्धेत सहभागी देशभरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेटपटूंच्या खेळाचा आनंद सर्वांनी लुटावा. त्याचप्रमाणे त्या खेळाडू आणि संघांचा खेळ पाहून आपल्याकडे तसे खेळाडू व संघ निर्माण होतील असे प्रयत्न केले जावेत, असे आवाहन आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले.