बेळगाव लाईव्ह : सारथी नगर येथील प्रार्थनास्थळ पाडण्यात यावे यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत प्रार्थनास्थळ बंद करण्यात आले नाही तर अयोध्येच्या धर्तीवर बेळगावमध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय प्रार्थनास्थळ पाडण्यात आले नाही तर पुढील संघर्षाची रूपरेषा ठरविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
रविवारी सायंकाळी सारथीनगर येथे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत सदर प्रार्थनास्थळाबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांची भेट घेऊन बेकायदेशीर प्रार्थनास्थळ हटविण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
ग्रामीण मतदार संघातील सारथीनगर येथे घर बांधकामासाठी परवनागी घेऊन त्याठिकाणी गेल्या वर्षभरात प्रार्थना स्थळ सुरु करण्यात आले आहे. याबाबत पालिकेने कोणतीही कारवाई न केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत सदर प्रार्थना स्थळ बंद करण्याची मागणी केली आहे. बेकायदेशीर रित्या सुरु करण्यात आलेले प्रार्थनास्थळ बंद करण्यात आले नाही तर याविरोधात भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यात भाजपचे सरकार असून आपण न्याय्य मागणी करत असून याबाबत जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन संजय पाटील यांनी दिले. हि मालमत्ता वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करून वक्फ बोर्डाने बेकायदेशीररीत्या प्रॉपर्टी डीडमध्ये दुरुस्ती केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन याविषयावर चर्चा करण्यात आली असता जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत भूमी अभिलेख तपासून योग्य ती उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.