बेळगाव लाईव्ह : बेळगावकरांसाठी खाद्यपर्वणी उपलब्ध करून देणाऱ्या, रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने अंगडी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर गेल्या सहा जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या, अन्नोत्सव या उपक्रमाचा रविवारी समारोप होत आहे.
गेल्या ९ दिवसांपासून सुरु असलेल्या या भव्य उत्सवात हजारो नागरिकांनी सहभाग घेत विविध प्रांतातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
जवळपास ६ राज्यातील खाद्यसंस्कृती एकत्रित आणून बेळगावकर खवय्यांसाठी खाद्यपर्वणी रोटरी क्लबच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून रविवारी या उपक्रमाचा समारोप होणार आहे.
हजारो बेळगावकरांनी अन्नोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सहकुटुंब भेट देऊन उस्फुर्त पाठिंबा दिला. त्यामुळे रोटरी क्लबच्या वतीने बेळगावकरांचे आभार मानण्यात आले आहेत.
या उपक्रमातून मिळालेला निधी बेळगाव शहर-परिसरातील समाजाभिमुख कार्यासाठी खर्च करण्यात येणार आहे, असे रोटरीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. देशाच्या विविध भागातील खाद्यपदार्थांचे व इतर असे एकंदर 200 स्टॉल्स या अन्नोत्सवामध्ये मांडण्यात आले आहेत.
यंदा अन्नोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने रोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते. खाद्यपर्वणीसह मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन रोटरीच्या वतीने करण्यात आले होते. दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्यामध्ये शरीर सौष्ठव स्पर्धा, गायन स्पर्धा, संगीत स्पर्धा, डान्स स्पर्धा, फॅशन शो ,कुकिंग स्पर्धा व सुपर वुमन कॉन्टेस्ट अशा विविध स्पर्धांचा समावेश होता.
अन्नोत्सवादरम्यान बेळगाव शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन येथील अन्नपदार्थ आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. रोटरीच्या या उपक्रमाचे बेळगावकरांनी आभार मानत अशी भव्य खाद्यपर्वणी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांचा प्रतिसाद पाहून यंदाच्या वर्षी अन्नोत्सवाचे नेहमीपेक्षा भव्य पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. यंदाही नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहून पुढेही हा उपक्रम अशाचपद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे रोटरीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.