बेळगाव मनपाचे काम आणि सहा महिने थांब अशीच गत शहरात सध्या पहायला मिळत आहे.बेळगाव महानगरपालिकेच्या कामावर एकंदर लोकांचा आता विश्वासच उडत चाललेला आहे.नागरी समस्येने त्रस्त असलेले नागरिक आता पालिका आणि आमदारांची खिल्ली उडूवू लागलेले आहेत.
होणाऱ्या आणि सुरू असलेल्या कामाची दिरंगाई आता नागरिकांना सहन होताना दिसत नाही म्हणून वैतागलेले नागरिक प्रशासनाची टर उडवत ‘कामाच्या पूर्तीची तारीख सांगा आणि हजार रुपये मिळवा’ अशी घोषणा असणारे फलक झळकावून महानगर पालिकेच्या एकंदर गलथान कारभाराला आव्हान देत आहेत.
गटारी स्वच्छ नसणे, विद्युत खांब कुठेही लावलेले असणे, पथदीप चालू नसणे,रस्त्यावर खड्डे, पाण्याच्या नावाने बोंब आणि साफ सफाई नसणे,कचरा उचल नाही या अनेक समस्यांनी त्रस्त झालेले नागरिक महा पालिका प्रशासनाला जाब विचारू लागलेले आहेत.सर्व बेळगावच्या नगरसेवकांची स्थितीअसून नसल्या सारखी आहे. महापौर निवड नसल्याने अद्याप त्यांच्या कडून कोणतेही काम होत नाही आहे अधिकारीही त्यांना जुमानत नाहीत अश्या परिस्थितीत स्थानिक आमदार आणि अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्वरित काम पूर्ण करा अशी मागणी यानिमित्ताने वाढू लागली आहे.
तहसीलदार गल्लीतील वार्ता फलकावर मजकूर लिहीत, सुरू असलेले विकास काम कधी पूर्ण होईल यांची माहिती सांगणाऱ्याला एक हजार रुपये बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे .तहसीलदार गल्ली प्रभाग 9 मध्ये रस्ते आणि गटार काम 10 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झाले होते ते अद्याप पूर्ण झाले नाही.
त्यामुळे संतापलेल्या गल्लीतील नागरिकांनी चक्क फलकावर मजकूर लिहीत काम कधी पूर्ण होईल याची अचूक माहिती देणाऱ्यास एक हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. सदर एक हजार रुपयांचे बक्षीस मिळवू इच्छिणारे स्थानिक आमदार आणि मनपा अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकतात अशी सुट देखील देण्यात आली आहे.
काही मिश्किल नागरिक ‘अमी ..ते’ नागरिक नव्हे अश्या मिश्किल स्वभावाचे ‘अभिजन’ हजार रुपयांसाठी ज्योतिषांची मदत घेण्यास मात्र सरसावले आहेत!!!