बेळगाव तालुक्यातील 32 गावांमधील शेतकऱ्यांच्या तिबार पीक देणाऱ्या सुपीक शेतजमिनी नष्ट करणाऱ्या नियोजित रिंग रोडच्या विरोधात आज सोमवारी संबंधित गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बायका व मुलाबाळांसह शेकडोच्या संख्येने झाडशहापूर येथे बेळगाव -खानापूर मार्गावर विराट रास्ता रोको आंदोलन छेडून चक्काजाम केला. यावेळी सरकारचा निषेध करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा बेळगाव रिंग रोडचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
बेळगाव रिंग रोडसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला असून त्याच्या विरोधात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी आज सकाळी झाडशहापूर येथे बेळगाव -खानापूर हमरस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले. बेळगाव रिंग रोड साठी तालुक्यातील 32 गावांच्या सुपीक शेत जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग करत आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या असल्या तरी न्यायालयीन लढा बरोबरच रस्त्यावरील लढाई देखील महत्त्वाची असल्याने आज सोमवारी सकाळी झाडशहापुर येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याद्वारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाला आपली ताकद दाखवून दिली. तसेच कोणत्याही परिस्थितीत तिबार पीक देणारी शेतजमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला द्यायचे नाही असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज सकाळी लवकर संबंधित 32 गावातील शेतकऱ्यांसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनाच्या ठिकाणी येताना दिसत होते. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्या देखील आंदोलन स्थळी आणल्या होत्या.
रस्ता रोको आंदोलनामधील शेतकरी कुटुंबातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या महिलांनी हातात रिंग रोड विरोधी फलक धरून रस्त्यावर ठिय्या मारला होता. सदर महिलांसह रास्ता रोकोत सहभागी होऊन जोरदार घोषणाबाजी करणारी शेतकऱ्यांची अजान लहान मुले व शाळकरी मुल-मुली साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. आंदोलनादरम्यान शेतकरी विरोधी रिंग रोड करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जय जवान जय किसान यासारख्या घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
या घोषणाबाजी बरोबरच दुसरीकडे भजनी मंडळाचा गजर देखील सुरू होता. त्यामुळे रास्ता रोकोच्या ठिकाणी एक वेगळेच वातावरण अनुभवावयास मिळत होते. आंदोलन स्थळी ठीकठिकाणी भगवे ध्वज डौलाने फडकताना दिसत होते.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना नंदीहळ्ळी येथील आंदोलनकर्ते शेतकरी परशुराम शेट्टप्पा कोलकार म्हणाले की, शेती म्हणजे आमची आई आहे. आईप्रमाणे आमची शेतजमीन आमचे मरेपर्यंत पालन पोषण करते. आता तीच शेतजमीन गेली तर आम्ही जगायचे कसे? आमच्या मुलाबाळांचे भवितव्य कसे सुरक्षित होणार? यासाठीच सुपीक शेतजमिनीच्या संपादना विरोधात आज आम्ही रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत आहोत. जर सरकारने रिंग रोडचा प्रस्ताव त्वरित मागे घेतला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन छेडून आम्ही सरकारला धडा शिकवू. रिंग रोडला विरोध करण्याबरोबरच नंदीहळ्ळी मार्गे बागेवाडीपर्यंत जो रेल्वे मार्ग जाणार आहे त्यालाही आमचा विरोध आहे असे सांगून रिंग रोडसाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमची शेत जमीन देणार नाही. त्यासाठी आमचा जीव गेला तरी बेहत्तर. शेतजमीन म्हणजे आमच्यासाठी सूर्य -चंद्राप्रमाणे आहे, असे परशुराम कोलकार यांनी स्पष्ट केले. शुभांगी गोरल यांच्यासह अन्य एका शेतकरी महिलेने रिंग रोडला आपला तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट केले. रिंग रोडच्या सर्वेक्षणासाठी जर अधिकारी आल्यास त्यांना आम्ही जोरदार विरोध करून माघारी धाडू. रिंग रोडमुळे आमची तिबार पीक देणारी सुपीक शेत जमीन नष्ट होणार आहे. तेंव्हा सरकारने रिंग रोड ऐवजी हवा तर फ्लाय ओव्हर ब्रिज बांधावा. आमच्या शेतजमिनी नष्ट झाल्या तर आमचा प्रपंच कसा चालणार? मुलांचे शिक्षण कशी होणार? असा सवाल करून रिंग रोडसाठी संपादन केल्या जाणाऱ्या शेत जमिनीची नुकसान भरपाई तसेच सरकारी नोकरी दिली जाईल असे सांगितले जात आहे.
मात्र ती नुकसान भरपाई आम्हाला आजन्म पुरणार नाही. तसेच 5 -10 हजार रुपये पगाराच्या सरकारी नोकरीमुळे आमचे घरदार चालणार नाही आणि मुलांचे शिक्षणही होणार नाही. यासाठीच आम्हाला रिंग रोड नको, असे शुभांगी गोरल यांनी सांगितले
सदर रास्ता रोको आंदोलनात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, आर. एम. चौगुले, ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. श्याम पाटील, ॲड. प्रसाद सडेकर, आर. आय. पाटील आदी नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली संबंधित 32 गावांमधील असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. सदर आंदोलनामुळे बेळगाव -खानापूर मार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.