पत्रकार विकास अकादमी या पत्रकारांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थेतर्फे रविवारी पत्रकार दिन आणि तिळगुळ समारंभ असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मराठा बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक बाळाराम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी अध्यक्ष प्रसाद सु. प्रभू यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना आदरांजली वाहून हा दिवस साजरा केला जात आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ वाटून पत्रकारांच्या आयुष्यात घडत असलेल्या विविध गोड घटनांना शुभेच्छा देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
बाळाराम पाटील यांच्याहस्ते बाळशास्त्री जांभेकर आणि आचार्य अत्रे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. नागालँड येथे जाऊन कुस्ती मैदान गाजवीत रौप्य पदक मिळविलेला बेळगावच्या मातीतील पैलवान अतुल शिरोळे, श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करीत 4 सुवर्ण आणि 1 कास्य पदक पटकावलेल्या ज्योती होसट्टी यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
इंग्रजी पक्षिकाच्या क्षेत्रात रुजू झालेले ज्येष्ठ पत्रकार एम डी मुल्ला यांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ वकील मारुती कामाण्णाचे यांनी तरुण भारत चे वरिष्ठ पत्रकार रमेश हिरेमठ यांना नुकताच गडहिंग्लज येथील धुमे प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव केला.
यानंतर पत्रकारितेच्या क्षेत्रात संघर्षमय कार्य करून आता संपादक पदाची भूमिका निभावत असलेले एम डी मुल्ला आणि हळीय संदेश चे संपादक कुंतीनाथ कलमनी यांनी आपल्या अनुभवांचे कथन केले.
ज्येष्ठ विश्वस्त प्रशांत बर्डे, उपाध्यक्ष वैजनाथ पाटील, रवी नाईक, जगदीश दड्डीकर, संजय चौगुले, चंद्रकांत कुपाठे आदींसह अनेक पत्रकार सदस्य उपस्थित होते.