बेळगाव लाईव्ह : सौंदत्ती येथे शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या श्री रेणुकादेवी यात्रेच्या निमित्ताने बेळगावमधील भाविक आज यल्लम्मा डोंगराकडे रवाना झाले. भंडाऱ्याची उधळण आणि ‘उदो गं आई उदो’ चा गजर करत हजारो भाविकांनी आज यल्लम्मा डोंगराकडे प्रस्थान केले.
सालाबादप्रमाणे यंदा शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यल्लम्मा डोंगरावर यात्रा भरत आहे. गेल्या २ वर्षात सौंदत्ती यल्लम्मा यात्रा कोविडमुळे रद्द करण्यात आली होती. यामुळे गेल्या दोन वर्षात भाविकांना हि यात्रा साजरी करता आली नाही.
मात्र यंदा कोविडचे सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी रवाना झाले आहेत. यंदा हि यात्रा ६ जानेवारी रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर बेळगावमधील रेणुकादेवी भक्तांचा जत्था रवाना झाला आहे.
सर्वप्रथम जोगनभावी कुंड येथे पडली पूजन विधी पार पडल्यानंतर यल्लम्मा डोंगरावर पुन्हा पडली पूजनाचा कार्यक्रम पार पडतो. तेथून पुन्हा बेळगावला परतणारे भाविक येऊन मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ठरलेल्या ठिकाणी येतात.
यावेळी ‘मारग मळणे’ म्हणजेच नावगोबाची यात्रा पार पडल्यानंतर सर्व भाविक आपल्या घरी परततात अशी प्रथा आहे. यंदा मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत नावगोबा यात्रेच्या जागी उभारण्यात आली असून शहर देवस्थान समितीला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यामुळे यंदा छ. शिवाजी नगर येथील जुन्या डेपो परिसरात हि यात्रा पार पडणार आहे. बुधवारी बेळगावमधील विविध गावातील हजारो भाविकांनी यल्लम्मा डोंगराकडे प्रस्थान केले असून भाविकांना परिवहन मंडळाने थेट बससेवाही उपलब्ध करून दिली आहे.