व्हॅक्सिन डेपो, टिळकवाडी -बेळगाव येथील 1906 साली बांधण्यात आलेल्या एका जुन्या काळातील दगडी इमारतीला नाविन्यपूर्ण जीर्णोद्धार प्रकल्पाद्वारे नवजीवन देण्यात आले आहे.
व्हॅक्सिन डेपोच्या आवारात आलेल्या इमारतीच्या या प्रकल्पासाठी 90 लाख रुपये खर्च करण्यात आले असून पारंपारिक शैलीच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता इमारत जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
व्हॅक्सिन डेपोतील सदर इमारत ही काळ्या दगडांची असून गोवरावरील लस तयार करण्यासाठी पूर्वी तिचा वापर केला जात होता. त्यानंतर ही इमारत 1983 पर्यंत जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान बनले होते. शासकीय निधीतून या इमारतीचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे.
या इमारतीत मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या निवासाची सोय व्हावी म्हणून स्मार्ट सिटी योजने अंतर्गत 90 लाखाचा निधी खर्च करण्यात आला आहे. हिरव्यागार वृक्षवल्लीने वेढलेल्या या इमारतीमध्ये चार गेस्ट रूम्स, हेल्पर्स रूम, स्वयंपाक घर, सार्वजनिकांसाठी बसण्याची जागा आणि अधिकाऱ्यांची बैठकीची जागा यांचा समावेश आहे. सुरक्षिततेसाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले असून इमारतीत अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
आता लवकरच व्हॅक्सिन डेपोमध्ये बॅडमिंटन, हॉलीबॉल आणि बास्केटबॉल कोर्ट उभारण्याची योजना आहे. कमीत कमी पर्यावरण नुकसान होईल याची काळजी घेत व्हॅक्सिन डेपोमध्ये सर्वसमावेशक बदल घडवून आणण्याची शासनाची योजना आहे त्याचाच हा एक भाग असणार आहे.
टिळकवाडी येथे सुमारे 150 एकर जमिनीत विस्तारलेल्या व्हॅक्सिन डेपोमध्ये आर्ट गॅलरी, एव्हिएशन म्युझियम आणि हेरिटेज पार्क उभारण्यात येत असून ही सर्व विकासकामे येत्या मार्च अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे.