बेळगाव : ६ जानेवारी रोजी श्री क्षेत्र सौंदत्ती येथे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या श्री रेणुकादेवी यात्रेसाठी रयत गल्ली, वडगाव येथील भाविक बैलगाडी आणि पायी दिंडीच्या माध्यमातून रविवारी रवाना झाले.
कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुकादेवी यात्रेला डिसेंबर महिन्यात सुरुवात झाली असून डिसेंबर महिन्यात कंकण-मंगळसूत्र विसर्जन विधी आणि ६ जानेवारी रोजी विवाह सोहळा अशा पद्धतीने यात्रा पार पडणार आहे.
या यात्रेयासाठी बेळगावमधून हजारो भाविक सौंदत्ती डोंगरावर दाखल होतात. बेळगावमधील रयत गल्ली, वडगाव येथील किसान होसूरकर यांनी पूर्वीपासून चालत आलेली बैलगाडीतून यात्रेला जाण्याची परंपरा जपत यंदाही गल्लीतील नागरिकांसमवेत बैलगाडीतून सौंदत्ती डोंगराकडे प्रस्थान केले आहे.
पिंटू मरवे, रंजन मरवे, पवन बिर्जे, लखन बिर्जे, संपत होसूरकर, बल्लू टुमरी यांच्यासह रयत गल्ली येथील महिलावर्गानेही या दिंडीतून प्रवास सुरु केला आहे. बैलगाडीचे पूजन करून चव्हाट गल्ली ज्योतिर्लिंग भक्त मंडळाचे प्रभाकर शहापूरकर, प्रा. आनंद आपटेकर, पंकज किल्लेकर यांच्या उपस्थितीत बैलगाडी प्रवासाला सुरुवात करण्यात आली.
मंगळवारी हे भाविक जोगनभावी येथे आणि मंगळवारी सायंकाळीच यल्लम्मा डोंगरावर पोहोचणार आहेत.
अनेक वर्षांपासून चालत आलेली बैलगाडीची परंपरा आजही रयत गल्ली, वडगाव मधील रेणुका भक्तांनी जपली असून या माध्यमातून धार्मिक परंपरेचा वारसा पुढील पिढीला देण्यात येत आहे.