बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारांना विविध भेटवस्तू देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्षांकडून होत आहे.
मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीलाच विजयी करण्यासाठी मराठी भाषिक एकवटला आहे.
आज ग्रामीण मतदारसंघात आयोजिण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेदरम्यान या गोष्टीचा प्रत्यय आला आहे. ग्रामीण मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेदरम्यान घरासमोर ‘जय महाराष्ट्र’ असा संदेश देणारी रांगोळी रेखाटून ऍड. सुधीर चव्हाण आणि कुटुंबीयांनी आपला पाठिंबा महाराष्ट्र एकीकरण समितीलाच असल्याचे जाहीर केले आहे.
ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी विरोधात जोरदार विरोध व्यक्त करण्यात येत असून याची प्रचिती वारंवार स्पष्ट होत आहे.
तालुका समितीतर्फे डॉ. एन. डी. पाटील स्मृतिदिन
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज मंगळवारी सीमातपस्वी सीमावासियाचे आधारवड भाई डॉ. एन. डी. पाटील यांचा पहिला स्मृतिदिन पाळण्यात आला.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात आज सकाळी डॉ. एन. डी. पाटील यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव तालुका म. ए. समिती व मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी भाई डाॅ. एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, मनोहर संताजी, रामचंद्र मोदगेकर, आर. आय. पाटील, माजी ता. पं. सदस्या सरस्वती पाटील, प्रेमा मोरे, कमळ मन्नोळकर, माधुरी हेगडे, निरा काकतकर, प्रेमा मोरे, नानु पाटील, कृष्णा हुंद्रे, सुरेश राजूरकर, पुंडलिक पावशे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.