बेळगाव लाईव्ह : माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांच्या कथित सीडी प्रकरणी आणखी एक ट्विस्ट आले असून रमेश जारकीहोळी यांनी सीडी प्रकरणी एक नवा दावा केला आहे. आपले राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी विरोधकांनी आपल्याविरोधात डाव रचला असून याप्रकरणी डी. के. शिवकुमार हे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.
बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सीडी आणि ऑडिओ क्लिप प्रसारित करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन्ही गोष्टी प्रसारित केल्या नसल्याने राजकीय वातावरण आणखीन तापण्याची शक्यता आहे.
तांत्रिक अडचणींमुळे किंवा राजकीय नाट्यामुळे ऑडिओ क्लिप प्रसारित झाली नाही. मात्र, यानंतर जारकीहोळी विरोधकांना या प्रकरणी पुन्हा टीका करण्यासाठी वाव मिळाला आहे.
राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी आपल्याविरोधात रचण्यात आलेल्या या कटात मोठे राजकारणी सहभागी आहेत. अधिकाऱ्यांना सीडीच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे काम केले जात असून सीडीमधील तरुणीसह चौघांना अटक करून, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सीडी प्रकरणातील युवती तिच्यासमवेत असलेले युवक आणि या साऱ्या प्रकारात सहभागी असलेल्या दोन नेत्यांची नावेदेखील आपण जाहीर करणार असल्याचा गौप्य्स्फोट रमेश जारकीहोळी यांनी केलाय. याप्रकरणामुळे माझे मानसिक खच्चीकरण झाले आणि मानसिक अस्वास्थामुळे आपण इतके दिवस शांत राहिलो. मात्र अनेकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आपण आता सावरलो असून आता आपण शांत बसणार नसल्याचे ते म्हणाले.
याप्रकरणी राज्य सरकारला एका पत्राची गरज असून सीबीआय तपासासाठी लागणारे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा जारकीहोळी यांनी केला आहे. या प्रकरणात डी.के. शिवकुमार यांच्यासह अन्य काही राजकारण्यांचा सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप आपल्याकडे असून सीबीआयकडे आपण त्या सोपविणार असल्याचेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे. व्यक्तिगत द्वेष ठेवून आपल्याविरोधात हे राजकीय षडयंत्र रचण्यात आले असून आपले राजकीय आयुष्य संपविण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे कुटील कारस्थान असल्याचेही जारकीहोळी म्हणाले. माझ्याप्रमाणे अन्य काही राजकारण्यांनाही डी. के. शिवकुमार आणि इतर राजकारण्यांनी ब्लॅकमेल करून कोट्यवधींची मालमत्ता जमा केल्याचा आरोपही जारकीहोळी यांनी केला.
डी. के. शिवकुमार यांच्याशी आपले घनिष्ठ संबंध होते. मात्र बेंगळुरू येथिल एका जमिनीच्या प्रकरणात दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. माझ्या विरोधात सीडी प्रकरणी रचलेल्या कटात सहभागी असलेल्यांवर तात्काळ अटक आणि कारवाई करण्यासाठी आपण सीबीआयकडे प्रकरण वर्ग करण्यासंदर्भात मागणी करणार आहोत. असे जारकीहोळी म्हणाले.
अश्लील सीडी प्रकरणात मी जर दोषी असेन तर स्वतःहून माझे मस्तक धडा वेगळे करून तुमच्यासमोर ठेवेन. डी. के. शिवकुमार यांनी केलेल्या कृत्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. माझ्याविरुद्धच्या अश्लील सीडीसाठी त्यांनी 40 कोटी खर्च केल्याचा ऑडिओ पुरावा देखील आहे. त्यामुळे माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे आणि सीबीआयने तात्काळ डी. के. शिवकुमार आणि कंपनीला अटक करून चौकशी करावी, असे जारकीहोळी म्हणाले.
कित्तूर राणी चन्नम्मा यांच्याबद्दल आपण कोणतेही गैरवक्तव्य केलेले नाही. हा देखील मला बदनाम करण्याचा एक डाव आहे. बेळगाव ग्रामीणचे आमदारांनी एका भाषणात स्वतःला राणी चन्नम्मा यांचे वंशज म्हटले होते. कित्तूर राणी चन्नम्मा किती महान आहेत हे सर्वांना माहीत आहे. तेंव्हा त्यांच्याशी ग्रामीणच्या आमदारांनी स्वतःची बरोबरी करणे योग्य नव्हे इतकेच मी म्हंटले होते. मात्र ऑडिओत काटछाट करून त्याचा विपर्यास करण्यात आला आहे असे स्पष्ट करून उद्या जर राज्यात जातीय तणाव निर्माण झाला तर त्याला डी. के. शिवकुमार व बेळगाव ग्रामीणचे आमदार जबाबदार असतील असे आमदार रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. तसेच बेळगाव ग्रामीण आमदारांच्या साखर कारखान्याची सीबीआय ईडी व इन्कम टॅक्स चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.