बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळींसह पोलीस आणि विविध अधिकारी देखील राजकारण करत असल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केला आहे. आज बेळगाव मध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर खुलासा केला आहे.
बेळगाव मध्ये राजकीय द्वेष आणि वैयक्तिक स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप ठेवून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. याचबरोबर विविध पद्धतीने कार्यकर्त्यांना वेठीला धरण्याचे काम पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत असून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने विरोधकांनी रचलेला हा डाव असल्याचा आरोपही रमाकांत कोंडुसकर यांनी केला.
विविध ठिकाणी असलेल्या दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर खोट्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. दक्षिण मतदार संघातील काही मोजक्या पोलिस स्थानकामधून हेतूपूर्वक लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन हे कृत्य करण्यात येत आहे. श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते हे केवळ समाजकारणासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. मात्र, समाजाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी देखील पोलीस आणि प्रशासनाकडून आडकाठी करण्यात येत आहे.
संघटनेच्या कार्यकर्त्यांवर तडीपार आणि रावडी शीट दाखल करण्याचे कार्य पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते समाजाभिमुख कार्य करून देखील त्यांना जाणीवपूर्वक अशा गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधींचा दबाव कारणीभूत आहे, असा आरोप रमाकांत कोंडुसकर यांनी केला. पोलीस अधिकाऱ्यांनी हा प्रकार वेळीच आवरला नाही तर याविरोधात भव्य मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात येईल, असा इशारा रमाकांत कोंडुसकर यांनी दिला.
बेळगावमध्ये अनेक उपक्रम विद्यमान लोकप्रतिनिधींकडून राबविले जातात. या दरम्यान कोणत्याही नियम आणि अटींची पूर्तता केली जाते किंवा अशा कार्यक्रमांसाठी रीतसर परवानगी घेतली जाते याबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला. मात्र, केवळ निवडणूक नजरेसमोर ठेवून श्रीराम सेना हिंदुस्थानच्या उपक्रमांना रोख लावण्यासाठी अधिकारी वर्गाकडून दबाव आणण्यात येत असल्याचा आरोप ही रमाकांत कोंडुसकर यांनी केला.
श्रीराम सेना हिंदुस्थानच्या माध्यमातून अन्यायाविरोधात लढा देण्यात येत आहे. जनता आता जागरूक झाली असून एकसंघ होत आहे. ही परिस्थिती पाहून विद्यमान लोकप्रतिनिधींच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून लोकप्रतिनिधी श्रीराम सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचे रमाकांत कोंडुसकर म्हणाले.