बेळगाव लाईव्ह : लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकारी करत आहेत. राऊडी शीट आणि तडीपार करण्याचा इशारा देऊन कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला असून समाजासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन खोटी कारवाई करू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात येईल, असा इशारा श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी दिला.
बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दक्षिण मतदार संघात खुलेआम गांजा विक्री आणि तस्करी करणाऱ्या घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र अशा घटनांकडे आणि घटनेमागील आरोपींकडे राजकीय वरदहस्त लाभल्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. या प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून , त्यांच्या दबावाखाली येऊन श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते निरपराध असूनही त्यांना नाहक वेठीला धरण्याचा प्रकार सुरु झाला आहे. माझ्या संघटनेतील कार्यकर्त्यांना अशापद्धतीने त्रास देण्यात आला तर आपण कदापि शांत बसणार नाही.
संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची, त्यांच्या पदाची आणि या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या प्रवासाची नक्कीच आठवण आणि जाणीव करून देण्यात येईल, शिवाय माझ्या संघटनेतील कार्यकर्त्यांना देण्यात येणारा नाहक त्रास थांबला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव करून देत अधिकारी पदापर्यंत येण्यासाठी आणि अधिकारी पदाची शपथ घेण्यासाठी ज्या गोष्टी केल्या जातात याची आठवण रमाकांत कोंडुसकर यांनी करून दिली. अधिकारी हे लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पगारावर काम करत नाहीत, तर जनतेने भरलेल्या इन्कम टॅक्स च्या माध्यमातून येणाऱ्या पगारावर काम करतात.
अधिकारी पदावर रुजू होताना भारतीय घटनेचे पालन करण्याची आणि कोणाच्याही दबावाखाली न येता, प्रामाणिक आणि निपक्षपणे काम करण्याची तसेच कोणावरही अन्याय होणार नाही याची शपथ घेतली जाते, मात्र बेळगाव मधील काही अधिकाऱ्यांना या शपथेचा आणि आपल्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसून येत आहे, अशा अधिकाऱ्यांना सर्व गोष्टींची आठवण करून देण्यात येईल, तसेच यासंदर्भात निवेदन सादर करण्यात येईल, असे रमाकांत कोंडुसकर म्हणाले.