Friday, November 15, 2024

/

ग्रामीण भागात विविध ठिकाणी बससेवेचा गोंधळ सुरूच

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच केवळ निवडणुकीच्या चाहुलीने सर्वच लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र अनेक ठिकाणी मूलभूत आणि पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचाच एक भाग म्हणजे, ग्रामीण भागात सध्या सर्वाधिक भेडसावत असलेली समस्या म्हणजे अपुरी, अनियमित बससेवा!

गेल्या कित्येक दिवसांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी, नागरिक रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हैराण झाले आहेत. मात्र आता या रस्त्यांवरून सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर परिवहन खात्याच्या बस चालकांनीही पाठ फिरवली आहे. आणि यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनियमित बससेवेचा फटका बसत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर याचा मोठा परिणाम जाणवत आहे.

वेळोवेळी देण्यात येणारा आंदोलनाचा इशारा, रास्ता रोकोचा इशारा किंबहुना काही ठिकाणी रास्ता रोकोचे उचललेले पाऊल या कोणत्याही गोष्टीला आजतागायत प्रतिसाद मिळाला नाही.

ग्रामीण भागातील बेळगुंदी परिसर तसेच अतिवाड, सुळगा, हिंडलगा, सिंधी कॉलनी, गणपती मंदिर, विनायक नगर, जयनगर, विजयनगर, गोकुळनगर, आंबेवाडी क्रॉस, कल्लेहोळ, उचगाव, बेकीनकेरे, तुरमुरी, बाची, शिनोळी, शिनोळी औद्योगिक वसाहत आदी ठिकाणी अनेक भागात बसचा तुटवडा जाणवत आहे. या मार्गावरून अनियमितपणे बस धावत असल्याने प्रवाशांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

तालुक्यातून शहरात कामानिमित्ताने येणाऱ्या तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. तालुक्यातून शहरात येण्यासाठी नागरिकांना बसचा प्रमुख आधार आहे. विविध गावातील जनता बस मधूनच प्रवास करणे पसंत करते. मात्र, सकाळच्या वेळेत तुरळक बस सेवा आणि दुपारनंतर अनियमित आणि कोलमडलेली बस सेवा याचा परिणाम विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसत आहे.

ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी दररोज बस प्रवास करून शिक्षणासाठी बेळगाव शहरात येतात. परंतुm बससेवा अनियमित असल्याने विद्यार्थ्यांना बस थांब्यावर ताटकळत उभे राहावे लागते. अनेक विद्यार्थी आणि नागरिक खाजगी वाहनातून प्रवास करत आहेत. मात्र, खाजगी वाहन चालकांना देखील अनियमित बस सेवेबाबत माहिती असल्यामुळे खाजगी वाहन चालकांकडून अतिरिक्त दर तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.

कित्येक ठिकाणी नागरिकांची विद्यार्थ्यांची गर्दी पाहून बस थांबा सोडून काही अंतरावर पुढे जाऊन बस थांबवली जाते. बसमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थी बसच्या मागे धावतात. मात्र, ही सारी परिस्थिती पाहूनही प्रशासन, परिवहन मंडळ आणि लोकप्रतिनिधी वाढीव बस सुविधा ग्रामीण भागासाठी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत आहेत.

परिणामी त्यांच्या या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले आहेत. यामुळे लोकप्रतिनिधी, परिवहन मंडळ आणि प्रशासनाने ग्रामीण भागातील सातत्याने उद्भवणाऱ्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष पुरून ही समस्या तातडीने सोडविणे आवश्यक आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.