बेळगाव : बेळगाव जिल्हा शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नालवतवाड यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत जिल्हा पंचायत सीईओनी बेंगळुरू शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडे नालवतवाड यांच्या बदलीची शिफारस केली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
जिल्हा पंचायत सीईओंनी सदर पत्र २४ ऑगस्ट रोजी सार्वजनिक शिक्षण विभागाच्या आयुक्तांना लिहिले होते. इतकेच नाही तर त्या पत्रात कर्तव्यात कसूर करण्याचे प्रकारही आकडेवारीसह स्पष्ट केले आहेत. अमृत शाळा कामकाजांतर्गत सुरु असलेल्या कामात कोणतीही प्रगती न करता गेल्या ५ महिन्यांपासून अहवाल सादर करण्यात आला नसल्याचीही तक्रार पत्रात करण्यात आली आहे.
सन २०१९-२० पासून, एसडीपीई आणि आरआयडीएफ अंतर्गत शाळा खोल्यांचे बांधकाम आणि दुरुस्ती याचप्रमाणे इतर योजनांची माहिती योग्यरित्या पुरविण्यात आली नाही. अपुरी माहिती, प्रगती आढावा बैठकीला अनुपस्थित राहणे, सभेत विहित माहिती न देणे अशाही तक्रारी शिक्षण विभागाच्या आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती खुंटण्यासाठी लोकसेवा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत बसवराज नालवतवाड हे थेट जबाबदार आहेत. त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जिल्ह्याच्या शैक्षणिक हितासाठी त्यांची बदली करण्यात यावी अशी शिफारस जिल्हा पंचायत सीईओंनी केली आहे.
डीडीपीआय नालवतवाड यांच्या दुर्लक्षामुळे बेळगाव जिल्ह्याच्या शिक्षण विभागाशी संबंधित कामे व कार्यक्रमांची योग्य अंमलबजावणी पिछाडीवर पडली आहे.
याबाबत अनेकवेळा बैठकीमध्ये तसेच वैयक्तिकरित्या सूचना देऊनही काहीच उपयोग झाला नसून नालवतवाड यांनी बेजबाबदारपणा दाखवला असून प्रगती आढावा बैठकीत समर्पक माहिती न देता पद आणि जबाबदारीची कर्तव्ये पार पाडण्यात कसूर करण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे.