कर्नाटक सरकारच्या गृहमंत्रालयाने बेळगावचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) रवींद्र गडादी व सहाय्यक पोलीस उपायुक्त (एसीपी) नारायण बरमनी यांच्यासह बेळगाव जिल्ह्यातील 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचाली गतिमान झाल्या असून त्या अनुषंगाने राज्यातील 13 आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये पोलीस उपायुक्त गडादी यांच्यासह बेळगावातील 4 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बेळगावचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्या जागी म्हैसूरचे पोलीस अधीक्षक शेखर एस. तिरकन्नावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे एसीपी रवींद्र गडादी यांची बेळगाव येथून बेंगलोर शहर कमांड सेंटर उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव मार्केट विभागाचे एसीपी नारायण बरमनी यांची बागलकोट जिल्ह्यातील हूनगुंद उपविभागामध्ये बदली झाली असून त्यांच्या जागी राज्य गुप्तचर खात्यातील प्रशांत सिद्दनगौडर यांची नेमणूक झाली आहे.
बेळगाव जिल्हा डीसीआरबीचे पोलीस उपाधीक्षक वीरेश दोडमनी यांची बळ्ळारी आयजीपी कार्यालयात बदली झाली असून त्यांच्या जागी ईशान्य विभाग आयजीपी कार्यालय गुलबर्गा येथील जेन्स लाय जेवीयन मेनेंजस यांची नियुक्ती झाली आहे. बेळगाव ग्रामीण एसीपी एस. व्ही. गिरीश यांची हुबळी -धारवाड सीसीबीमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बेंगलोर वाहतूक पश्चिम उपविभागाचे गोपाळकृष्ण बी. गौडर यांची नेमणूक झाली आहे. या खेरीज राज्य गुप्तचर विभागातील बसवराज भोजप्पा लमानी यांची बेळगाव जिल्ह्यातील नंदगड पोलीस ठाण्यात,
एम. बी. नगर पोलीस ठाणे कलबुर्गीचे चंद्रशेखर यांची मारहाळ पोलीस ठाण्यात, कलबुर्गी रहदारी पोलीस ठाणे क्र. 2 मधील अमरेश बी. यांची माळमारुती पोलीस ठाण्यात तर सीएसपीचे रन्नकुमार यांची बेळगाव खडेबाजार पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. बदलीच्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी तडकाफडकी रुजू व्हावे, अशी सूचना करण्यात आली आहे.