मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आईची शपथ घेत 29 डिसेंबर रोजी पंचमसाली लिंगायत समाजाला आरक्षणाची घोषणा केली. तथापि त्यांनी आम्हाला अपेक्षित आरक्षण दिले नाही. पंचमसाली समाजाला दिलेले 2 -डी आरक्षण आम्ही नाकारत असून 2 -ए आरक्षणासाठी आमचा लढा सुरूच राहील, असे कुडलसंगम पिठाचे पू. श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी स्पष्ट केले.
सरकारने घोषित केलेल्या आरक्षणासंदर्भात शहरातील गांधी भवन येथे आज गुरुवारी पंचमसाली समाजाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्वामीजी म्हणाले की मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आम्हाला हवे ते आरक्षण मिळणार की नाही ते 24 तासात स्पष्ट करावे.
सरकारने येत्यात 12 जानेवारीपर्यंत आरक्षण जारी करून राजपत्रात तशी घोषणा करावी. ही घोषणा न झाल्यास 13 जानेवारी रोजी हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथील मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर एक दिवसीय तीव्र आंदोलन छेडले जाईल असे सांगून स्वामीजींनी ‘चलो हावेरी’ आंदोलनाची घोषणा केली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय आम्ही फेटाळून लावतो. हावेरी येथे 30 ते 40 हजाराहून अधिक समाज बांधवांसमवेत आम्ही आंदोलन करणार आहोत. 2 -ए आरक्षणाची घोषणा न झाल्यास हावेरी येथे पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आमच्या जनशक्तीचा आगामी 2023 च्या निवडणुकांवर परिणाम होईल.
पंचमसाली लिंगायत समाज सर्व प्रकारच्या लढ्यासाठी सक्षम व सज्ज आहे. जी सुविधा 2 -ए आरक्षणामध्ये आहे, तीच आम्हाला द्यावी. सरकारच्या 2 -डी आरक्षणामुळे संभ्रम निर्माण झाला आहे, असेही श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी म्हणाले.