बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या पुढाकाराने अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमुळे सरदार्स मैदानावरील टेनिस बॉल क्रिकेटचे एक प्रकारे पुनरुज्जीवन झाले आहे. भव्य बक्षीस रकमेच्या या स्पर्धेमुळे बेळगावकरांचा टेनिस बॉल क्रिकेट मधील आनंद अधिकच द्विगुणित झाल्याचे पहावयास मिळत असून शहरातील माजी मातब्बर खेळाडूंच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने सरदार्स मैदानावरील कॉमेंट्री बॉक्सच्या ठिकाणी बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने शहरातील जुन्या माजी क्रिकेटपटूंशी संवाद साधून त्यांची टेनिस बॉल क्रिकेट व सरदार्स मैदानाविषयी प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी बोलताना बेळगावचे एकेकाळचे मातब्बर टेनिस बॉल यष्टीरक्षक (विकेटकीपर) सुनील देसुरकर म्हणाले की, बेळगावातील टेनिस बॉल क्रिकेटचे माहेरघर म्हणजे सरदार्स मैदान आहे.
क्रिकेटसाठी इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदान जगप्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीचे बेळगावच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचे लॉर्ड्स मैदान म्हणजे हे सरदार्स मैदान होय. बेळगावच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक नामवंत खेळाडू झाले आहेत. बेळगाव आत पूर्वीच्या काळी सतीश चौगुले, सुभाष कंग्राळकर, मुकुंद देसुरकर, प्रमोद (पप्पू) रेवणकर, संगम पाटील असे बरेच मातब्बर खेळाडू होऊन गेले. यापैकी काही मोजके खेळाडू रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेपर्यंत पोहोचले. मात्र दुर्दैवाने पूर्वी क्रिकेटमध्ये कारकीर्द घडविण्यासाठी पुरेसा वाव नसल्यामुळे तसेच अन्य कांही कारणास्तव बेळगावचे बरेच खेळाडू क्रिकेटमध्ये फारसे पुढे जाऊ शकले नाहीत.
त्या काळात बेळगावच्या संबंधित क्रिकेटपटूंचा मोठा दबदबा होता. मुंबईमध्ये आयोजित राजकपूर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी 1986 मध्ये आम्ही बेळगाव कम्बाईंड टीम घेऊन मुंबईला गेलो होतो. आमच्या खेळाडूंनी अत्यंत चमकदार खेळाचे प्रदर्शन करत सर्वांची मने जिंकण्याबरोबरच त्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. उपांत्य फेरीत आम्हाला दुर्दैवाने पराभव पत्करावा लागला तरी मुंबईच्या क्रिकेट शौकिनांनी आम्हा बेळगावच्या संघाची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती असे सांगून त्या स्पर्धेत मला उत्कृष्ट यष्टिरक्षक हा 25 हजार रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तत्कालीन समालोचक दिलीप दोशी यांनी देखील बेळगावच्या खेळाडूंची भरभरून तारीफ केली होती, अशी माहिती सुनील देसुरकर यांनी दिली.
माजी क्रिकेटपटू व माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी यांनी टेनिस बॉल क्रिकेट मधील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना बलराम युवक मंडळाच्या माध्यमातून आपण 1984 पासून सातत्याने 10 वर्षे भव्य बक्षीस रकमेच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत होतो अशी माहिती दिली. अलीकडच्या काळात बेळगावातील टेनिस बॉल क्रिकेटला काहींशी मरगळ आली असली तरी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून येथील टेनिस बॉल क्रिकेटला नवसंजीवनी दिली आहे. आमदार बेनके यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठ्या बक्षिस रकमेची स्पर्धा आहे हे विशेष होय. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत मातब्बर खेळाडू भाग घेत आहेत ही बाब निश्चितपणे बेळगावच्या नावलौकिकात भर घालणारी आहे असे सांगून अशा स्पर्धा यापुढेही भरविल्या गेल्या पाहिजेत, अशी अपेक्षा ॲड. गवळी यांनी व्यक्त केली.
आमदार ॲड. अनिल बेनके यांनी यावेळी बोलताना आपल्या मित्रमंडळींसह सर्व क्रिकेट शौकिनांनी सरदार्स मैदानावर भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जावी अशी इच्छा व्यक्त केली होती ती इच्छा आपण पूर्ण करत असल्याचे सांगितले. यंदाच्या या स्पर्धेचे वैशिष्ट्य हे आहे की, दरवेळी शहरातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये स्थानिक संघच खेळतात. बऱ्याच जणांनी मला आंतर प्रभाग, आंतर जिल्हा यासारख्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचा सल्ला दिला. मात्र मला ते पटले नाही, कारण आपल्या भागातील खेळाडूंचा खेळ क्रिकेट शौकिनांना माहीत असतो. यासाठी परराज्यातील राष्ट्रीय स्तरावरील मातब्बर खेळाडूंचा खेळ त्यांचा दर्जा येथील स्थानिक खेळाडू आणि प्रेक्षकांना लक्षात यावा. येथील खेळाडूंनी देशातील स्टार खेळाडूंच्या खेळातील बारकावे, चांगल्या गोष्टी शिकाव्यात म्हणून मी ही स्पर्धा भरवली आहे असे सांगून खेळात जोपर्यंत आवड निर्माण होत नाही तोपर्यंत चांगले खेळाडू निर्माण होत नाहीत, असे आमदार बेनके यांनी स्पष्ट केले.
सरदार मैदानाबद्दल बोलताना ते म्हणाले की, सरदार्स मैदान हे एक असे मैदान आहे की मी मुंबई, बेंगलोर वगैरे ठिकाणी गेल्यानंतर तेथील खेळाडू व क्रिकेटप्रेमी सरदार्सवर क्रिकेट स्पर्धा भरवा असे सांगतात. थोडक्यात सरदारस मैदान म्हणजे बेळगावचे लॉर्ड्स मैदान आहे. संपूर्ण भारतात टेनिस बॉल क्रिकेटसाठी प्रसिद्ध सरदार मैदाना सारखे दुसरे मैदान नाही. मोठमोठ्या खेळाडूंची या मैदानावर एकदा तरी खेळण्याची इच्छा असते.
सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत गेल्या दोन दिवसात आपण मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, बेंगलोर, हुबळी -धारवाड, गुलबर्गा येथील स्टार क्रिकेटपटूंचा खेळ पाहत आहोत. आता यापुढे जम्मू-काश्मीर, मुंबई, राजस्थान, गुजरात वगैरे देशाच्या कानाकोपऱ्यातील मातब्बर संघ व खेळाडू या स्पर्धेसाठी सरदार्स मैदानावर येणार आहेत अशी माहिती देऊन बेळगावच्या तमाम क्रिकेट शौकिनांनी या स्पर्धेचा आनंद लुटावा, असे आवाहन आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले.