अगसगे (ता. जि. बेळगाव) येथील करगुप्पीकर माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी शरण्या शशिकांत कुंभार हिने गुजरात येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील पॅरा ऑलिंपिक सागरी जलतरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले आहे.
पोरबंदर (गुजरात) येथील श्रीराम ओशन स्विमिंग क्लबतर्फे आयोजित अखिल भारतीय पॅरा ऑलिंपिक सागरी जलतरण स्पर्धा ‘सिमिंथन -2023’ नुकतीच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. सदर स्पर्धेत देशभरातील असंख्य जलतरणपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये खुल्या गटात सरस कामगिरी नोंदविताना बेळगावच्या शरण्या कुंभार हिने सुवर्णपदक मिळविले आहे.
जागतिक विक्रमाची नोंद करणाऱ्या जिया राय या जलतरणपटूने पोरबंदर येथील राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र तिला देखील मागे टाकून शरण्या कुंभार हिने प्रथम क्रमांक पटकाविला हे विशेष होय. या कामगिरीची पोरबंदर येथील प्रसारमाध्यमांनीही दखल घेऊन शरण्या कुंभार हिचे मुक्तकंठाने कौतुक केले.
मार्कंडेयनगर एपीएमसी येथील सामाजिक कार्यकर्त्या संतोषकला शशिकांत कुंभार यांची कन्या असलेली शरण्या सध्या इयत्ता दहावीत शिकत आहे. या लहान वयात दिव्यांगांसाठी (पॅरा) असणाऱ्या अनेक स्पर्धा तिने गाजविल्या आहेत. बेंगलोर येथे 2022 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने 3 सुवर्णपदके पटकाविली असून त्यानंतर राजस्थान येथील राष्ट्रीय स्पर्धेत 2 सुवर्णपदके हस्तगत केली आहेत.
त्याचप्रमाणे अलीकडे आसाम येथे झालेल्या दिव्यांगांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तिने 200 मी. फ्री स्टाइल, 100 मी. फ्री स्टाइल व 100 मी. बॅकस्ट्रोक शर्यतींमध्ये सुवर्णपदक हस्तगत केले आहे. मागील महिन्यात मालवण येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत भाग घेऊन तिने पहिल्यांदाच समुद्री स्पर्धेचा अनुभव घेतला होता. त्या अनुभवाच्या जोरावर तिने पोरबंदर येथे नुकत्याच झालेल्या दिव्यांगांच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चक्क प्रथम क्रमांक पटकाविला हे कौतुकास्पद आहे. आई संतोषकला यांच्याकडून मिळत असलेला मोठा पाठिंबा व प्रोत्साहन याच्या जोरावर शरण्या हिने गेल्या वर्षभरात विविध जलतरण स्पर्धांमध्ये मिळून एकूण 13 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
शहरातील सुवर्णजीएनएमसी तलावात पोहण्याचा सराव करणाऱ्या शरण्या हिला जलतरण प्रशिक्षक विकास कलघटगी आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल शरण्या कुंभार हिचे तिच्या शाळेसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.