बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची शक्ती प्रदर्शनाची रणधुमाळी सुरू असून आगामी निवडणुकीच्या तयारीमध्ये ग्रामीण मतदार संघाचे इच्छुक उमेदवार कंबर कसून तयारीला लागले आहेत.
भाजपमधील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर, माजी आमदार संजय पाटील आणि ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यात मोठी चुरस लागली आहे. एकीकडे विद्यमान लोकप्रतिनिधींकडून वितरित करण्यात येणाऱ्या भेटवस्तू, त्या भेटवस्तू घेण्यासाठी महिला वर्गाची सुरू असलेली धडपड आणि मतदारांच्या नजरेत वरचढ होण्यासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांकडून प्रत्युत्तर दाखल वितरित करण्यात येणाऱ्या भेटवस्तू यामुळे सध्या ग्रामीण भागातील महिला वर्गाची चंगळ सुरू आहे.
गेल्या १५-२० दिवसात विद्यमान ग्रामीण आमदारांनी भेटवस्तू देण्याचा जोरदार सपाटा सुरु केला आहे. याला प्रत्त्युत्तर म्हणून भाजप इच्छुक उमेदवारांनी विविध मेळावे, कार्यक्रम आयोजित करून भेटवस्तूंचा वर्षाव करत प्रत्त्युत्तर देण्यास सुरुवात केली.
मंगळवारी भाजपाचे इच्छुक उमेदवार, रमेश जारकीहोळी समर्थक आणि हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी हिंडलगा परिसरात भव्य हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही केले. यादरम्यान माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. तसेच मंगळवारी झालेल्या हळदी- कुंकू कार्यक्रमात देखील हजारो महिला वर्गाच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
विद्यमान ग्रामीण आमदारांकडून होणारे मिक्सर-कुकरचे वाटप याला प्रत्युत्तर दाखल आज नागेश मन्नोळकर यांनी हळदी-कुंकू समारंभात महिला वर्गाला ‘माहेरची साडी’ आणि ‘हॉट बॉक्स’ भेटीदाखल देत ‘हम भी किसीसे कम नही’! हे दाखवून दिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल यापेक्षा ग्रामीण मतदारसंघातील मतदारांना किती आणि कशा प्रकारच्या भेटवस्तू मिळतील याकडे प्राधान्याने पाहिले जात आहे.