बेकवाड (ता. खानापूर) येथील तरुण शेतकऱ्याचा बिडी जवळील बाळेकोडल शिवारात खून झाल्याची घटना आज (दि.१९) सकाळी उघडकीस आली.
यल्लाप्पा शांताराम गुरव (वय ३३, रा. बेकवाड, ता. खानापूर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
या घटनेची नोंद नंदगड पोलिस ठाण्यात झाली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुरव कुटुंबाची बिडी जवळील बाळेकोडल शिवारात शेत जमीन आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास शेतातील घराबाहेर यल्लाप्पा याचा मृतदेह आढळून आला.
शेतात एकच घर असल्याने तसेच आजूबाजूला कोणतीही वस्ती नसल्याने सकाळी शेतात गेलेल्या इतर शेतकऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आला.
त्यांनी याबाबतची माहिती नंदगड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शेत जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.