प्रतिवर्षीप्रमाणे हुक्केरी (जि. बेळगाव) तालुक्यातील मौजे मोदगे (मोहनगे) येथील श्री भावेश्वरी देवीचा यात्रोत्सव माघ पौर्णिमेनंतर येत्या सोमवार दि. 6 ते बुधवार दि. 8 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून भाविकांना यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मौजे मोदगे येथील श्री भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी आणि श्री भावकाई देवी मंदिर परिसर विकास व यात्रा उत्सव कमिटी मोदगे (मुंबई) यांच्यावतीने श्री भावेश्वरी देवी यात्रा उत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवार दि. 6 फेब्रुवारी रोजी शस्त्रइंगळ्या कार्यक्रम होणार असून हा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहील, त्यानंतर तो बंद होईल.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार दि. 7 फेब्रुवारी रोजी भरयात्रा होईल. शेवटच्या दिवशी बुधवारी 8 फेब्रुवारी रोजी पालखी सोहळ्याने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी याची नोंद घेऊन यात्रेला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन श्री भावकाई देवी पाटील ट्रस्ट समिती व पाटील मित्र मंडळ मोदगे (मुंबई) यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे यंदा घटप्रभा नदीला पाणी खूप असल्यामुळे भाविकांनी कृपया मोदगे बंधाऱ्यावरून वाहतूक करावी अशी सूचनाही आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.