बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील अनेक ठिकाणं कित्येक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहेत. वाजलेल्या आणि गाजलेल्या अशा अनेक घटनांमुळे सुप्रसिद्ध असलेले बेळगावमधील चन्नम्मा सर्कल जवळ असलेले ‘सरदार्स मैदान’ हे देखील यापैकीच एक! ज्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानांपैकी प्रतिष्ठित मैदान म्हणून लॉर्ड्स मैदानाची ओळख आहे अशीच ओळख बेळगावच्या ‘सरदार्स’ मैदानाची आहे. उन्हाळी सुट्ट्या असोत किंवा इतर क्रीडास्पर्धा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे मैदान विविध स्पर्धांचे साक्षीदार ठरले आहे. अलीकडे या मैदानावर इतर कार्यक्रम देखील आयोजित केले जात आहेत. मात्र क्रिकेट या खेळासाठी प्रसिद्ध असलेले बेळगावमधील लॉर्ड्स यंदा पुन्हा गजबजणार आहे.
आमदार अनिल बेनके आयोजित, ऑल इंडिया लेव्हल, टेनिसबॉल क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा या मैदानावर आयोजित करण्यात आली असून क्रिकेट खेळाडूंसाठी हि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या मैदानावर यापूर्वी अनेक रणजी खेळाडूंनी सराव केला आहे. याच मैदानावर सराव केलेले अनेक क्रिकेटर्स आज यशाच्या शिखरावर आहेत. १९८० ते २००० या दरम्यान अनेक क्रिकेट चषक स्पर्धा या मैदानावर गाजल्या आहेत. गोव्यातील सुभाष कंग्राळकर यांच्यासह अनेक रणजीपटूंनी या मैदानावर क्रिकेट सामना रंगविला आहे.
अनेक रणजी क्रिकेटपटूंची कारकीर्द देखील सरदार्स वरूनच सुरु झाली आहे. यादरम्यान बेळगावच्या क्रिकेट खेळात देखील बरीच सुधारणा झाली. याच मैदानावर सराव करून बेळगावचा संघ राजकपूर चषकात देखील खेळला आहे. मुकुंद देसूरकर, विवेक पटेल यांच्यासारख्या अनेक ‘स्टम्प विकेट किपर’नी याच मैदानावरून कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
सरदार्स मैदान हे क्रिकेटसाठी सुप्रसिद्ध आणि बेळगावमधील एकमेव मैदान म्हणून प्रसिद्ध आहे. या मैदानावर यापूर्वी झालेल्या क्रिकेट सामन्यांसाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी व्हायची. असंख्य क्रिकेटप्रेमी या मैदानावर तळ ठोकून बसायचे. महापौर चषक, माजी आमदार रमेश कुडची पुरस्कृत रेणुका चषक यासारख्या अनेक क्रिकेट स्पर्धांचा साक्षीदार सरदार्स मैदान ठरले आहे. बेळगावमधील गोगो टीम, मराठा स्पोर्ट्स, विनर्स, शाईन बॉईज, बॅड बॉईज यासारख्या अनेक गाजलेल्या संघांनी या मैदानावर क्रिकेट स्पर्धा गाजविल्या आहेत.
अलीकडे या मैदानावर प्रेक्षक गॅलरीचीही सोय करण्यात आली आहे. मात्र मध्यंतरी या मैदानावर अनुचित प्रकार घडल्याने काही कालावधीसाठी मैदान सर्व कार्यक्रमांसाठी बंद ठेवण्यात आले होते. यादरम्यान सुनसान झालेले मैदान, खेळाडू आणि प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत होते. याचप्रमाणे अलीकडे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या व्यसनाधीन झालेली मुलेही मैदानी खेळाकडे पाठ फिरवत आहेत. सरदार्स मैदानावर यापूर्वी मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉकर्स याचप्रमाणे खेळणाऱ्या मुलांनी मैदान गजबजून जायचे.
क्रिकेटपटूंसाठी हक्काचे मैदान असणाऱ्या सरदार्स मैदानावर आमदार अनिल बेनके यांच्या माध्यमातून क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील क्रिकेट संघ या स्पर्धेत उतरणार आहेत. मुंबई, गोवा, कोल्हापूर, सावंतवाडी यासारख्या अनेक ठिकाणाहून विविध संघ क्रिकेट स्पर्धा रंगविणार असून क्रिकेटप्रेमींसाठी हि नामी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून नवी पिढी पुन्हा खेळाकडे आकर्षित होईल आणि १०-१५ दिवस सरदार्स पुन्हा पूर्वीप्रमाणेच गजबजेल आणि या माध्यमातून जुन्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळेल.