सर्व शेतकऱ्यांची संमती असल्यास यडवाल शिवारातील महत्त्वाच्या कच्च्या संपर्क रस्त्याचे विकास काम तात्काळ युद्धपातळीवर हाती घेण्यात येईल, असे आश्वासन बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिले आहे.
अलारवाड क्रॉसनजीक असलेल्या यडवाल शिवारातील कच्चा रस्त्याला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. सदर शिवारात शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या सोमवारी आमदार ॲड. अनिल बेनके यांची भेट घेऊन आपल्या शिवारातील सुमारे 2 -2.5 कि.मी. अंतराच्या कच्च्या संपर्क रस्त्याचे डांबरीकरण अथवा कॉंक्रिटीकरण करावे अशी मागणी केली होती.
तसेच आपल्या मागणीचे निवेदन आमदारांना सादर केले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज बुधवारी दुपारी यडवाल शिवाराला भेट देऊन तेथील कच्च्या संपर्क रस्त्याची पाहणी केली.
पाहणीअंती उपस्थित शेतकऱ्यांसमोर बोलताना आमदार बेनके म्हणाले की, जिल्हा पंचायतीच्या अखत्यारित असलेला सदर संपर्क रस्ता मी महापालिकेकडे हस्तांतरित करून घेतला आहे. या रस्त्याच्या बांधकामाच्या बाबतीत दोन शेतकऱ्यांची समस्या आहे. त्यांनी रस्ता बांधकामास आक्षेप घेतला आहे.
तेंव्हा सर्वांनी एकमताने संमती दर्शविली तर रस्त्याच्या बांधकामाला तात्काळ सुरुवात केली जाईल. लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत घेऊन या रस्त्याचा विकास करता येऊ शकतो. सध्याची या रस्त्याची अवस्था पाहता वाहने आत येऊ शकत नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. पावसाळ्यात तर अधिकच बिकट परिस्थिती निर्माण होत असावी. तेंव्हा सर्वांनी संमती दिल्यास कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ न देता रस्त्याचे बांधकाम केले जाईल. रस्त्याच्या विकास कामात जर एखाद्याची जमीन जात असेल तर सरकार दरबारी प्रयत्न करून नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल. एकंदर हा रस्ता चांगला झालाच पाहिजे. या आधीच वर्षभरापासून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे असे सांगून सर्व शेतकऱ्यांनी एकमताने परवानगी दिल्यास या रस्त्याच्या विकासाचे काम तात्काळ हाती घेतले जाईल, असे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्पष्ट केले
आमदारांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत आश्वासन दिल्याप्रमाणे संपर्क रस्त्याला भेट देऊन शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतल्याबद्दल नगरसेवक रवी साळुंखे यांनी शेतकऱ्यांच्यावतीने त्यांचे आभार मानले. तसेच सर्वांच्या हिताच्या दृष्टीने यडवाल शिवारातील शेतकऱ्यांनी एकमताने रस्त्याच्या विकास कामास परवानगी द्यावी असे आवाहनही नगरसेवक साळुंखे यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांनी पुष्पहार घालून आमदार ॲड. बेनके यांचा सत्कारही केला.
यावेळी नगरसेवक बसवराज मोदगेकर,माणिक शंकरगौडा, पायू शंकरगौडा, महावीर जनगौडा, बाहुबली मदुकर, इंद्राचरण जनगौडा, भरत संकन्नावर, महावीर मल्लिगोळ, राजू संकन्नावर, बसू संकन्नावर, बाळू पाटील, लक्ष्मण शिंदे, सतीश शिंदे, परशराम भागोजी, बाळू हुद्दार, विजय हुद्दार, सुनील माळवी, मुकेश धामणकर, विश्वनाथ पाटील, संतोष संकन्नावर, राजू जनगौडा, महावीर अनोजी, अनिल माळवी, रघु पाटील अनंत पाटील लक्ष्मण जोडगुंडे आदींसह बेळगाव, शहापूर व अलारवाड परिसरातील शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.