बेळगाव लाईव्ह एक्सक्लुसिव्ह: बेळगाव विधानसभा मतदार संघातील सर्वाधिक चुरस असलेला मतदार संघ म्हणजे ग्रामीण मतदार संघ! एकाच पक्षातील सर्वाधिक इच्छुक उमेदवारांची उमेदवारीसाठी चुरस, उमेदवारी मिळावी म्हणून जल्लोषात आणि दिमाखात साजरे होणारे कार्यक्रम, कार्यक्रमाच्या माध्यमातून दर्शविले जाणारे शक्तिप्रदर्शन आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाटण्यात येणाऱ्या भेटवस्तू हे सारे चर्चेचे आणि कुतूहलाचे विषय ग्रामीण मतदार संघासह संपूर्ण बेळगावमध्ये उत्सुकतेचे ठरत आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीपासून सुरु झालेले भेटवस्तू देण्याचे उपक्रम यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील सुरु आहेत. शुक्रवारी बेळगाव तालुक्यातील अनेक गावातून मिक्सर वितरीत करण्यात आले आहेत.एकीकडे एका पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून होणारे कुक्कर-डबे-मिक्सर वाटप आणि दुसरीकडे दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांकडून वाटल्या जाणाऱ्या इतर भेटवस्तू निवडणुकीपेक्षाही अधिक प्रतिक्षेचा विषय ठरल्या आहेत.
या भेटवस्तू घेण्यासाठी महिलावर्गाची प्रचंड गर्दी होत असून ग्रामीण भागातील मतदार संघात मिळणाऱ्या या वस्तूंचा लाभ घेण्यासाठी आसपासच्या परिसरातील आणि चक्क शहरातील महिलांचीही उपस्थिती लागत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. यासाठीच म्हणून कि काय यंदा ‘गुलाल लावलेल्या नारळाची’देखील चालती आहे. ग्रामीण भागात मंदिरासमोर गुलाल लावलेला नारळ हातात घेऊन, अमुक उमेदवारालाच मत देण्याची शपथ घेऊन तो नारळ फोडला कि त्यानंतरच भेटवस्तू देण्यात येत आहे. शिवाय ग्रामीण भागातील महिलाही डोक्यावरून मिरवत या भेटवस्तू घरी आणत असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
ग्रामीण विधानसभा मतदार संघात सर्वाधिक विकासकामे झाल्याची चर्चा बेळगावभर सुरु आहे. त्यामुळे विकासकामांच्या दृष्टिकोनातून भेटवस्तू वाटप करण्याची आणि गुलाल लावलेल्या नाराळासोबत शपथ घेऊन नारळ फोडून भेटवस्तू देण्याची वेळ लोकप्रतिनिधींवर का आली? असा प्रश्न राजकीय वर्तुळात आणि जाणकार मतदारांकडून व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधींचा विश्वास आपल्या विकासकामांवर नाही कि आपल्या मतदार संघातील मतदारांवर नाही? कि आगामी विधानसभा निवडणुकीच्या धास्तीने हा सारा खटाटोप सुरु आहे? असे प्रश्नदेखील उपस्थित होऊ लागले आहेत.
‘प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं’ असं म्हणतात. त्यामुळेच कि काय राजकीय युद्धात आजी-माजी आणि भावी लोकप्रतिनिधींकडून आपले नशीब आजमावण्यासाठी अशा विविध कल्पना लढविल्या जात आहेत! मात्र जागरूक मतदाराहो आता आपले मत देताना ‘विकाऊ’ नको तर ‘टिकाऊ’ व्हावे या दृष्टिकोनातून अंतर्मुख होऊन विचार करूनच मतदान करा.. एवढेच सांगणे!
सर्व उमेदवार एकच माळेचे मणी 😂😂😂
कोणी पण धुतल्या तांदळाचा नाही …….