केएमएफ दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेऊन केएमएफ अध्यक्ष व आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी दाखविलेल्या स्वारस्यामुळे नंदिनी दूध प्रक्रिया प्रकल्प बेळगावमध्ये उभारण्याचा प्रस्ताव असून या सुमारे 300 कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पासाठी मुबलक पाणी असलेल्या भागातील 100 एकर जागेचा शोध घेण्यात येत आहे.
हा नंदिनी दूध प्रक्रिया प्रकल्प बेळगावमध्ये झाल्यास या भागातील हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक पशुधन उद्योगाला चालना मिळणार आहे. कर्नाटक मिल्क फेडरेशन (केएमएफ) केवळ दुधाचा आर्थिक व्यवहार करत नाही तर पेढे, पनीर यासारख्या दुधाच्या इतर उपउत्पादनांची निर्मिती आणि विक्रीही करते.
ज्यातून वर्षाला हजारो कोटींची उलाढाल केली जाते. आता दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सुसज्ज युनिट बांधण्याची तयारी सुरू आहे याबाबत केएमएफ अध्यक्ष व आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी स्वारास्य दाखविली आहे. तसेच अलीकडेच त्यांनी बेळगावमध्ये हा प्रकल्प निर्मितीचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली होती.
नंदिनी उत्पादनांची मागणी वाढल्यामुळे नवीन प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. जिल्ह्यात हजारो शेतकरी दुग्ध व्यवसायावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत. तथापि सध्या दूध व्यवसाय घरोघरी दूध पोचविणे, हॉटेल, खाजगी व्यक्तींना विकणे व केएमएफ डेरींना दूध पुरवठा करण्यापूर्वी मर्यादित आहे. दुग्धजन्य पदार्थाचे युनिट उभारल्यास दुधाची मागणी दुप्पट होणार असून दुग्ध व्यवसायाला चालना मिळणार आहे. केएमएफ दुग्धजन्य पदार्थांना गोवा आणि महाराष्ट्रात मोठी मागणी आहे. गोवा आणि पुणे येथे केएमएफसी डेपोही सुरू केले आहेत.
परंतु दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीसाठी चे युनिट केवळ बेंगलोरला आहे. बेंगलोर येथून गोवा व महाराष्ट्रात उत्पादने पाठवायला वेळ लागतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांना उत्पादनांचा पुरवठा कमी वेळेत करता येईल या दृष्टिकोनातून बेळगाव येथे प्रकल्पाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे.