बेळगाव लाईव्ह : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठा मंदिर कार्यालयाच्या सभागृहात युवा दिनानिनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून आरपीडी महाविद्यालयाचे प्रा. मायाप्पा पाटील आणि कार्वे येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रा. गीता संजय मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्वाला अनुसरून प्रा. मायाप्पा पाटील बोलताना म्हणाले, शिवराय जन्माला घालण्यासाठी जिजाऊ निर्माण होणे गरजेचे आहे.
जिजाऊ आणि शिवबा हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरावेत यासाठी शिवचरित्राचे वाचन घरोघरी होणे गरजेचे आहे. शिवराय पुतळ्यात आहेत, पुस्तकात आहेत, चौकाचौकात आहेत परंतु शिवराय विचारात आणि आचरणात आणणे अत्यंत महत्वाचे आहे. शिवराय हे पुस्तक नव्हेत, शिवराय पुतळ्यापुरते मर्यादित नव्हेत, शिवराय म्हणजे एक विचार आहे, संस्कार आहे. हा संस्कार प्रत्येकाच्या मनात रुजणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरानादायो इतिहासाबद्दल त्यांनी तरुणाईला उद्देशून भाषण केले. ३९ वर्षाच्या जीवनात विवेकानंदांनी घडविलेले कार्य अमूल्य असून आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो हे महत्वाचे असून यानुसार आजच्या तरुणाईने जीवनाचा मार्ग निवडावा, असा सल्ला त्यांनी दिला.
प्रा. गीता मुरकुटे यांनीही उपस्थितांना उद्देशून विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,आजकाल स्वाभिमान विकलेले, लाचार, दुबळे, तरुण आजूबाजूला पाहायला मिळतात. आज घराघरात जन्माला येणाऱ्या युवा पिढीने आणि मातांनी जिजाऊ आणि शिवबाच्या इतिहासाची, आणि विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांची उजळणी करण्याची आवश्यकता आहे.
तालुका समितीच्या वतीने मराठा मंदिरात युवा दिन राजमाता जिजाऊ जयंती साजरी pic.twitter.com/GQ4CRp4qJO
— Belgaumlive (@belgaumlive) January 12, 2023
हल्ली आपण मुलांना सहजपणे मोबाईल हातात देतो. परंतु आपल्या देशातील महापुरुषांची चरित्रं आपण त्यांच्या हाती देत नाही, हे दुर्दैव आहे. हल्ली मोबाईलमधील गोष्टींचे अनुकरण लवकर केले जाते. यानुसार योग्य वेळेतच पुस्तकातील विचारातून, विचारमंथन करून पिढी घडवणे, युवा पिढीला डोळस बनविणे अत्यावश्यक आहे. यासाठी पालकांमध्ये जागरूकता आली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, प्रेमा मोरे, माजी आमदार मनोहर किणेकर, शहर म. ए. समिती नेते दीपक दळवी, ॲड. एम. जी. पाटील, दत्ता उघाडे, मनोहर संताजी व्यासपीठात होते. आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, एस. एल. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, महेश जुवेकर, आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील आदींसह अनेक मान्यवर आणि बहुसंख्य मराठी भाषिक महिला, समिती कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली. मराठा मंदिरचे सभागृह खचाखच भरले होते.