अन्यायाच्या बेडीतुन सुटका करणे समिती नेत्यांच्या हाती! ‘त्याच’ गोष्टींची पुनरावृत्ती झाली तर याद राखा…!निद्रावस्थेतील समितीला जागवण्याची गरजविधानसभेवर मराठी नेतृत्वाच्या एकमुखी जयघोषाची गरज!
बेळगाव लाईव्ह विशेष : विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपल्या असूनही अद्याप महाराष्ट्र एकीकरण समिती निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीची चाहूल लागताक्षणीच राष्ट्रीय पक्षांनी निवडणुकी संदर्भातील हालचाली वेळेआधीच गतिमान केल्या आहेत. मात्र, अजूनही महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कोणत्याही प्रकारची हालचाल पहावयास मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र एकीकरण समितीने लवकरात लवकर उमेदवारी जाहीर करण्याबरोबरच निवडणुकीचे धोरण आणि रणनीती ठरविण्यासंदर्भात ठोसपणे आगेकुच करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत गटातटाचे राजकारण जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आले. सीमाभागातील एका मुखपत्राच्या माध्यमातून एकाच मतदारसंघातून दोन उमेदवार घोषित करण्यात आले. तसेच मनपाला वेगळीच यादी सादर करण्यात आली. यामुळे समितीमध्ये झालेल्या बंडखोरीचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसून आला. आणि मराठी माणसाची ससेहोलपट सुरु झाली. मराठी माणसाचे नेतृत्व करणारे, बाजू मांडणारे आणि न्याय मागणारेच कुणी सीमाभागात नसल्याने मराठी माणसाची अवस्था गेल्या ५ वर्षात दयनीय झाली आहे. समिती नेत्यांमध्ये पडलेली फूट आणि मांडण्यात आलेला वेगळ्या चुली याला वैतागलेला मराठी माणूस समिती नेत्यांविरोधात बंद पुकारण्याचा तयारीत आहे.
कर्नाटक सरकारची मराठी भाषिकांवर होत असलेली गळचेपी, अन्याय आणि अत्याचार या विरोधात सध्या मराठी माणसाने समिती नेत्यांना अल्टिमेट दिला आहे. समिती नेत्यांनी एकीच्या दृष्टिकोनातून एकमेव उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून सीमाभागात पुन्हा मराठीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कसोटी पणाला लावण्याची गरज असल्याचे मत मराठी माणसातून व्यक्त होते. समिती नेत्यांच्या बेकीमुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला आलेले वाईट दिवस पाहून दिशाहीन कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय पक्षांपुढे लोटांगण घातले. परंतु आज प्रत्येक मराठी भाषिकांच्या मनात मराठीसाठीची तळमळ आणि धग हि कायम आहे.
कार्यकर्त्यांच्या आवाहनानुसार तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने एकीकडे आगेकूच केली आहे. याचा प्रत्यय खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीच्या निर्णयावरून आला आहे. तालुक्यातील मराठी भाषिकांमध्ये या एकीनंतर नवचैतन्य निर्माण झाले आहे. मात्र, आता प्रत्येकाची नजर मध्यवर्ती आणि शहर महाराष्ट्र एकीकरण समितीकडे खिळली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत सीमाभागात उत्तर, दक्षिण, ग्रामीण आणि खानापूर मतदार संघात म. ए. समितीच्या उमेदवारालाच विजयी करण्याचा पण मराठी भाषिकांनी केला आहे. मात्र, या विधानसभा निवडणुकीत पद, खुर्ची, सत्ता आणि वैयक्तिक स्वार्थासाठी गटातटाचे राजकारण आणि बंडखोरीला कदापिही जागा देण्यात येणार नाही, असा ठाम पवित्राही मराठी भाषिकांनी घेतला आहे. आजही प्रत्येक मराठी माणसाच्या अंतःकरणातून मराठीसाठी जीव तीळतीळ तुटत आहे. समिती नेत्यांनी वेळीच हि बाब हेरली नाही तर भविष्यात सीमाभागातील मराठी माणसाचे जगणे कठीण होईल, आणि याचा शाप समिती नेत्यांना नक्कीच भोवेल!